शंभर खोके… एकदम ओके! कल्याण-डोंबिवली महापालिकेला ‘लक्ष्मी दर्शन’, जून अखेरीस तिजोरीत 100.30 कोटींचा मालमत्ता कर जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

5 टक्के सलवत घ्या, पण कर भरा, घरबसल्या ऑनलाइन क्लिक करा, पण कर भरा, हवं तर दोन टक्के जादा सवलत घ्या पण कर भरा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले आणि काय आश्चर्य केडीएमसीच्या तिजोरीला चक्क लक्ष्मी दर्शन झाले. जून अखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत चक्क 100 कोटी 30 लाखांचा मालमत्ता कर जमा झाला. महापालिकेने त्याची आकडेवारी जाहीर करताच हे शंभर खोके एकदम ओक्के आहेत, अशी मिश्कील प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवलीकरांमधून उमटली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी काटेकोर नियोजन केले. 2026-27 ची मालमत्ता कराची बिले घरोघरी पोहोचवलीच, पण महापालिकेच्या संकेतस्थळावरूनही ती उपलब्ध केली. त्यामुळे नागरिकांना महापालिकेत माराव्या लागणाऱ्या फेऱ्या टळल्या. लोकांनी घरबसल्या ऑनलाइन मालमत्ता कर भरला. 31 जुलैपर्यंतचा मालमत्ता कर भरणाऱ्यांना शासकीय कर वगळून 5 टक्के सलवत जाहीर करण्यात आली. त्यात ऑनलाइन कर भरल्यास जादा 2 टक्के सवलतीची मुभा देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना एकूण 7 टक्के सवलत मिळाली. याचा फायदा नागरिकांना आणि महापालिकेलाही झाला.

32.42 कोटी जादा मिळाले

जून 2026 अखेरपर्यंत 1 लाख 19 हजार 464 करदात्यांनी ऑनलाइन पद्धतीने तब्बल 48.72 कोटींचा मालमत्ता कर भरला. उर्वरित नागरिकांनी महापालिकेत येऊन 51.58 कोटींचा कर भरला. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एकूण 100 कोटी 30 लाख रुपये कराच्या रूपाने जमा झाले आहेत. गेल्या वर्षी जूनअखेर मालमत्ता करापोटी अवघे 67.88 कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे यंदा 32.42 कोटींचे जादा लक्ष्मी दर्शन महापालिकेला झाले आहे.