शिवसेना आमदारांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना धारेवर धरले; डेव्हलपमेंटसाठी कन्सेन्ट घेता, मग स्मार्ट मीटर लावताना का नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विकास प्रकल्पांसाठी (डेव्हलपमेंट) हवाशांची कन्सेन्ट घेतली जाते मग स्मार्ट मीटर लावताना का तली जात नाही, असा परखड सवाल करत मुंबईतील शिवसेनेसह अन्य पक्षांच्या आमदारांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना धारेवर धरले. हाव्यवस्थापकांनी दिलेली आश्वासने सहा महिन्यांत पूर्ण झाली नाहीत तर त्यांच्याविरुद्ध हक्कभंग आणू, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलवलेल्या बैठकीत आमदारांनी दिला.

 

मागील महिन्यापासून दक्षिण व मध्य मुंबईच्या अनेक भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. रोज आठ-आठ तास वीज खंडित राहिल्याने रहिवासी व व्यावसायिक हैराण झाले होते.  विरोधी पक्षाच्या आमदारांनी तो मुद्दा विधानसभेत मांडला होता. त्याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी यासंदर्भात बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह संबंधित विभागाचे अधिकारी व संबंधित आमदारांची बैठक विधानसभा अध्यक्ष नार्वेकर विधान भवनातील आपल्या दालनात बोलवली होती.

 

या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना साकोरे-बोर्डीकर, शिवसेना आमदार अजय चौधरी, महेश सावंत, मनोज जामसुतकर, अनंत नर, काँग्रेस आमदार अमीन पटेल, भाजप आमदार मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यासह बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

अजय चौधरी यांनी यावेळी वीज पुरवठ्याच्या मुद्द्यावर बेस्ट महाव्यवस्थापकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पुनर्विकास प्रकल्प उभारताना रहिवाशांची कन्सेन्ट घेतली जाते मग मुंबईत स्मार्ट मीटर लावताना संबंधित रहिवाशांची परवानगी का घेतली जात नाही, असा सवाल चौधरी यांनी विचारला. महाव्यवस्थापकांनी यावेळी बेस्टच्या वीज पुरवठ्याबाबत सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सादरीकरण नको, वीज पुरवठा कधी पूर्ववत होणार ते सांगा, अशी मागणी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी केली.

 

लालबाग-परळ, अभ्युदयनगर, बी.डी.डी. चाळ, भोईवाडा, मुंबादेवी, भायखळा, प्रभादेवी, माहीम इत्यादी विभागामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत ठोस उपाययोजना करा. विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकरिता बेस्ट उपक्रमाकडे फक्त दोन गाड्या उपलब्ध असून गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी.

 

बेस्ट उपक्रमाकडे मीटर, केबल इत्यादी साहित्याचा तुटवडा असल्याने पुनर्विकसित इमारतीमध्ये मीटर लावण्यास सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही घराचा ताबा घेण्यास विलंब होत आहे.

बेस्ट उपक्रमाकडून ग्राहकांना विनाकारण स्मार्ट मीटर लावण्याची जबरदस्ती करू नये. वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करताना जंपीक वायरचा वापर करून तात्पुरती दुरुस्ती केली जाते. जंपीक वायर अनेक वर्षे तशीच लटकत असल्याने अपघाताच्या घटना घडू शकतात. त्यामुळे अशा जंपीक बायर तातडीने हटवण्याचे निर्देश द्यावेत.