ब्राँझच्या किमती वाढल्यामुळे इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीत विलंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्राँझ धातू आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

अशोकराव माने यांनी इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लेखी उत्तर दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे कंत्राट शापूरजी पालनजी या कंपनीला दिले आहे.

 

शापुरजी पालनजी कंपनी व शिल्पकार राम सुतार फाईन आर्टस् यांच्यातील करारानुसार कांस्य धातूची किंमत ८५० प्रति किलोप्रमाणे देण्यात आली होती. सद्यस्थितीत कांस्य धातूची किंमत १५०० ते १७०० रुपये प्रति किलो झाल्याचे कंत्राटदाराकडून कळवण्यात आल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाल्यावर प्रकल्प सल्लागार व मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून छाननी करून पुढील | योग्य कार्यवाही करण्यात येईल असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.