
एल.एल.बी. अभ्यासक्रमातील सेमिस्टर-6 च्या निकालात विद्यापीठाने घोळ घातला असून २९ विद्यार्थ्यांना ‘शून्य’ गुण दिले आहेत. यावर युवासेनेने संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप युवासेनेने केला.
शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागील पाच सत्रांमध्ये उत्तम गुण मिळाले होते, तसेच त्यांनी एल.एल.एम. सीईटी परीक्षेतही चमक दाखवली होती; अशा हुशार विद्यार्थ्यांनाही निकालात ‘शून्य’ दाखवून नापास करण्यात आले. हा केवळ तांत्रिक दोष नसून विद्यापीठाच्या गलथानपणाचा कळस आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परम यादव, किसन सावंत, स्नेहा गवळी आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी थेट प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेतली.
युवासेनेची मागणी
शून्य गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यात यावी. ही प्रशासकीय चूक असून त्याची चौकशी झाली पाहिजे; तसेच संबंधित दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत सुधारित निकाल लागत नाही, तोपर्यंत एल.एल.एम. प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी युवासेनेने निवेदनाद्वारे विद्यापीठाकडे केली आहे.






























































