मनुष्यबळ घोटाळा करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत टाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसई-विरार महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठ्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून हे काम दिलेल्या एजन्सीला काळ्या यादीत टाकून संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

वसई-विरार महानगरपालिकेमार्फत मे. सैनिक एजन्सी या संस्थेला मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले. निविदेनुसार एकूण 174 मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात सुमारे 70 टक्के कमी कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनीही याबाबतीत कमालीची गुप्तता पाळली आहे. एकूण 174 मनुष्यबळ नेमण्यात न आल्याबद्दल विचारणा करूनही उत्तर मिळालेले नाही. तसेच कामगारांना देण्यात येणारे आवश्यक सुरक्षा साहित्य जसे की, गमबूट, हातमोजे, मास्क इत्यादी कोणतेही साहित्य पुरविण्यात आलेले नाही. ही महापालिकेची फसवणूक असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय आहे. या भष्टाचारामध्ये पालिकेचे संबंधित अधिकारी आणि अभियंता यांचे संगनमत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची आणि मे. सैनिक एजन्सीची सखोल चौकशी करून या एजन्सीला काळ्या यादीत टाकून एजन्सीला दिलेल्या इतर कंत्राटांनाही स्थगिती द्यावी, अशी मागणी आमदार महेश सावंत यांनी केली.