
ऐरोली येथील महापालिका रुग्णालयात चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे गर्भवतीचा पोटातील बाळासह झालेला मृत्यू आणि नेरुळ येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दोन तरुणींना बसलेला विजेचा धक्का, या दोन्ही प्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एका डॉक्टरला आणि एका कार्यकारी अभियंत्याला आज तडकाफडकी निलंबित केले. आयुक्तांच्या या धडक कारवाईमुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे केबल पालिकेच्या स्ट्रीट लाइटची नेरुळ येथील एलपी जंक्शन येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शॉकसर्किट झाल्यामुळे शुभांगी बलखंडे आणि उज्ज्वला वाघ या दोन तरुणींना विजेचा जोरधार धक्का बसला. त्यामुळे त्या दोघीही जागीच बेशुध्द पडल्या. या ठिकाणी असलेल्या विद्युत केबलवरील अवरण निघून तारा उघड्या पडल्या होत्या. सुरवातीला ही केबल महावितरणची असल्याचा कांगावा महापालिकेने केला. मात्र नंतर ही केबल पालिकेच्या स्ट्रीट लाइटची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आयुक्तांनी कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना निलंबित केले.
ऐरोली रुग्णालयात उपचार सुरू असताना सोनम डोंगरे या गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह काल मृत्यू झाला. तिला चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अन्य एक गर्भवती रिचा मिश्रा हिलाही याच इंजेक्शनमुळे त्रास झाला आहे. तिच्यावर सध्या वाशी येथील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार ऐरोली रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे उघड झाल्याने आयुक्तांनी आज त्यांना निलंबित केले.
ऐरोली आणि नेरुळमध्ये घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. त्यामुळे या घटनांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयुक्तांना घेराव घालण्यात आला. त्यामुळे महापालिका मुख्यालयात तणाव निर्माण झाला होता.





























































