
उशिरा दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने ठाणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवली. अनेक भागात पाणीच पाणी झाल्याने पालिकेच्या नालेसफाईचा पुरता फज्जा उडाला आहे. त्याची पोलखोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याने सलग दोन दिवसांपासून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पाहणी दौऱ्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र फोटोबाजी कसली करताय? ही तर जनतेच्या पैशाची लूट सुरू असल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे. ठाणे शहरातील नालेसफाई फक्त कागदावरच असल्याचा जोरदार समाचार त्यांनी घेतला.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई झाली, सखल भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आणि आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे, असे मोठमोठे दावे करणाऱ्या ठाणे मान्सून पूर्व केलेले सर्वेक्षण आणि नालेसफाईच्या खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे. त्यात कंत्राटदार किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा महापालिकेवर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.
नालेसफाईच्या नावाखाली केवळ कागदोपत्री बिले काढून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम प्रशासनाच्या आशीर्वादाने झाले आहे. ठाण्याला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या घोषणा हवेत विरल्या असून साधे ड्रेनेजचे पाणी उपसण्याची यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नाही.
महापालिकेचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आणि घोडबंदरच्या भागांमधील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुन नालेसफाईचे केलेले दावे पहिल्याच पावसात वाहन गेल्याचे समोर आले.
केदार दिघे (ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना)





























































