खामेनींच्या अंत्यसंस्कारावेळी हल्ला केला तर याद राखा, इराणचा अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. खामेनी यांच्या अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याचे अत्यंत गंभीर आणि भयानक परिणाम होतील, असा कडक इशारा इराणने अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे. ‘रॉयटर्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

अमेरिका आणि इस्रायलने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इराणवर हवाई हल्ले करत युद्धाचा शंखनाद केला होता. युद्धाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये खामेनी यांचा मृत्यू झाला होता. आता जवळपास चार महिन्यांनी खामेनी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक लॉरा लुमर यांनी खामेनींच्या अंत्यसंस्काराबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली होती.

खामेनींचा अंत्यसंस्कार इस्रायलसाठी बॉम्ब हल्ले करण्यासाठी मोठी संधी आहे, असे लॉरा लुमर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले होते. यानंतर इराणने खामेनींच्या अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई किंवा हल्ला न करण्याची चेतावणी दिली आहे. इराणच्या खाताम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सचे कमांडर अली अब्दुल्ला यांनी सरकारी माध्यमांद्वारे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

आम्ही इराणच्या शत्रूंना, विशेषतः अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी देतो की त्यांनी कोणतीही चुकीची पावले उचलू नयेत. आमच्या देशावर कोणताही हल्ला झाल्यास, आमचे सशस्त्र दल किती भीषण प्रत्युत्तर देऊ शकते, याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा अली अब्दुल्ला यांनी दिला. तत्पूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनीही इराणच्या जनतेवर किंवा नेतृत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे तात्काळ आणि सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटे होते.

9 जुलैला अंत्यसंस्कार 

अयातुल्लाह अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आली असून 4 जुलै रोजी तेहरान येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. 9 जुलै रोजी खामेनी यांचे मूळ गाव मशहद येथे दफनविधी होणार आहे. या दरम्यानच्या काळात इराणच्या शेजारील राष्ट्रांमध्ये शोकसभा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.