Ratnagiri News – मुख्यमंत्री म्हणतात अणुउर्जा प्रकल्पांची ठिकाणं निश्चित नाहीत, मग गोवळ,सोलगाव आणि बारसू ग्रामपंचायतीला भूसंपादनाची पत्र कशाला? सामाजिक कार्यकर्ते सत्यजित चव्हाणांकडून भांडाफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अणुऊर्जा प्रकल्पाचा फक्त सामंजस्य करार झाला आहे, ठिकाणं निश्चित झाली नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली आहे. ही एक प्रकारे दिशाभूल आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एक्स हॅंडलवर अणुऊर्जा प्रकल्पाचा सामंजस्य करार आणि त्याची ठिकाणं स्पष्टपणे दिली होती. दुसरीकडे राजापूर तहसीलदारांकडून गोवळ,सोलगाव आणि बारसू ग्रामपंचायतींना भूसंपादनाची पाठवलेली पत्र कशासाठी? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स हॅंडलवर अणुऊर्जा सामंजस्य कराराची माहिती देताना कंपनी आणि कुठे प्रकल्प होणार याची माहिती जाहिर केली होती आणि आता मुख्यमंत्री अणुऊर्जा प्रकल्पाची ठिकाणे निश्चित नाहीत हे सांगतात मग विश्वास कशावर ठेवायचा हा प्रश्न पडला आहे.

सत्यजित चव्हाण यांनी सांगितले की, राजापूर तहसीलदारांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी बारसू, गोवळ आणि सोलगाव ग्रामपंचायतींना पत्र पाठवली आहेत. ही पत्र महसूल, वनविभाग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा प्रवास करत आली आहेत.अणुऊर्जा प्रकल्पाची ठिकाणं निश्चित नाहीत मग भूसंपादनाची पत्र कशी पाठवली? हा प्रश्न सत्यजित चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांचा विरोध
अणुऊर्जा प्रकल्पांना ग्रामस्थांनी विरोध केला आहे. गोवळ आणि सोलगाव ग्रामपंचायतींनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध असल्याचे पत्र दिले आहे. पूर्णगड-मेर्वी येथे अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती स्थापन करण्यात आली आहे. गोवळ,मुणगे आणि हिंदळे ग्रामपंचायतींनी अणुऊर्जा प्रकल्पाच्याविरोधात ठराव केले आहेत, असे सत्यजित चव्हाण यांनी सांगितले.