
हरदडा–उमरखेड या खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या चिखलमय रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी हरदडा फाटा येथे संतप्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावत नागरिकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी रस्त्याचे काम करणाऱ्या जी.एन.आय. कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवघे १५ किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून पार करण्यासाठी किमान दीड तास लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
आंदोलनादरम्यान नागरिकांनी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची ही अवस्था झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी हरदडा–उमरखेड रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.






























































