
पोर्तुगालचा सामना म्हटलं की सर्वांचं लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर असतं. रोनाल्डोने गोल केला की चाहत्यांना राष्ट्रीय सण वाटतो आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो; पण क्रोएशियासारख्या दिग्गज संघासमोर खेळताना रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत संघाला तारले असले तरी पोर्तुगालच्या विजयाचा खरा हीरो हा गोंसालो रामोस ठरला. कारण रामोसने निर्णायक गोल केल्यामुळेच पोर्तुगालला हा सामना 2-1 असा जिंकता आला. या विजयानंतर पोर्तुगालचा पुढचा सामना 16 संघांच्या फेरीत स्पेनशी होणार आहे.
रोनाल्डोच्या पेनल्टीमुळे पोर्तुगालचे कमबॅक
पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांनी आक्रमणं केली खरी, पण कोणालाही त्यामुळे यश मिळाले नाही; पण दुसऱया सत्रामध्ये खेळाला वेग आला जेव्हा 53 व्या मिनिटाला इव्हान पेरिसिचने एक शानदार गोल करून क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण क्रोएशियाला ही आघाडी फक्त 15 मिनिटंच ठेवता आली. कारण त्यानंतर सर्वांनाच ज्या गोष्टीची उत्सुकता होती ते घडलं. सामन्याच्या 68 व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून 1-1 अशी बरोबरी साधली.
रामोसचा अविस्मरणीय गोल
सामना अतिरिक्त वेळेकडे जात आहे असे वाटत होते. रोनाल्डोलाही मैदानाबाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे पोर्तुगालची विजयाची आशा धुसर दिसत होती. पण यावेळी पोर्तुगालसाठी संकटमोचक ठरला तो गोंसालो रामोस. इंज्युरी टाइममध्ये (90+4 मिनिटांवर) रामोसने जादुई गोल करून पोर्तुगालला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला. त्यामुळे पोर्तुगालच्या या विजयाचा खरा नायक रामोस ठरला.
81 व्या मिनिटाला रोनाल्डो मैदानाबाहेर
या स्पर्धेतील रोनाल्डोचा हा तिसरा गोल होता. यापूर्वी त्याने गट फेरीत उझबेकिस्तानविरुद्ध दोन गोल केले होते. बरोबरीचा गोल केल्यानंतर काही मिनिटांतच प्रशिक्षकांनी त्याला सामन्याच्या 81 व्या मिनिटाला बदली केले. या मोसमातील विश्वचषकात रोनाल्डोला बदली करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याच्या बदलीनंतर युवा खेळाडू गोंझालो रामोसने शेवटच्या क्षणी गोल करून प्रशिक्षकाचा निर्णय योग्य ठरवला.
बाद फेरीतील ‘गोलदुष्काळ’ संपवला
या सामन्यात रोनाल्डोने बाद फेरी सामन्यांमधील आपला गोलचा दुष्काळही संपवला. यापूर्वी पाच विश्वचषकांमधील आठ बाद फेरीच्या सामन्यांमध्ये त्याने एकही गोल केला नव्हता, त्याचबरोबर एकही असिस्ट केला नव्हता. रोनाल्डोच्या नावावर आता सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये एकूण 11 गोल आहेत. इतकेच नाही, तर तो युरोपियन चॅम्पियनशिप आणि फिफा विश्वचषक या दोन्ही स्पर्धांमध्ये 25 गोल करणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू ठरला. आता त्याच्या नावावर 232 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी 146 गोल आहेत.
रोनाल्डो ठरला वयस्कर खेळाडू
रोनाल्डोने एका गोलमुळे फुटबॉलच्या इतिहासात आपले नाव कोरले. वयाच्या 41 व्या वर्षीही आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला रोनाल्डो आता विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात गोल करणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. 41 वर्षे आणि 147 दिवसांच्या वयात या पोर्तुगीज कर्णधाराने दुसऱया हाफमध्ये पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव कोरले.
लिओनेल मेस्सीला मागे टाकले
या सामन्यापूर्वी विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात गोल करणाऱया सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम लिओनेल मेस्सीच्या नावावर होता. आता रोनाल्डोने त्याला मागे टाकले आहे, पण हा विक्रम किती काळ टिकेल याची खात्री नाही. कारण मेस्सीसुद्धा अर्जेंटिनासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील रोनाल्डोचा हा पहिलाच गोल होता.
21 क्रमांकाची जर्सी घालण्यामागे काय कारण होते?
सर्वात भावनिक क्षण सामन्यानंतर आला जेव्हा रोनाल्डो मैदानावर आपले अश्रू आवरू शकला नाही. त्यावेळी रोनाल्डोने 21 क्रमांकाची जर्सी परीधान केल्याचे पाहायला मिळाले. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू डिओगो जोटा यांच्या निधनाला 3 जुलैला एक वर्ष पूर्ण झाले. जोटा आणि त्यांचा भाऊ आंद्रे सिल्वा यांचा 3 जुलै 2025 या दिवशी स्पेनमध्ये एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. हा अपघात त्यांच्या लग्नानंतर अवघ्या 11 दिवसांनी घडला होता. आपल्या दिवंगत सहकाऱयाच्या आठवणीने संपूर्ण पोर्तुगाल संघ भावुक झाला होता. रोनाल्डोने जोटाची 21 क्रमांकाची जर्सी घालून मैदानावर प्रवेश केला आणि हा विजय आपल्या माजी सहकाऱयाला समर्पित केला. अंतिम शिट्टीनंतर त्याने डोळ्यात अश्रू आणून आपल्या सहकाऱयांना मिठी मारली आणि चाहत्यांना अभिवादन केले.






























































