
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
पूर्वाह्ने प्रतिबोध्य पङ्कजवनान्युत्सार्य नैशं तम कृत्वा । चन्द्रमसं प्रकाशरहितं निस्तेजसं तेजसा ।
मध्याह्ने सरितां जलं प्रविसृतैरापीय दीप्तैः करैः । सायाहे रविरस्तमेति विवश किं नाम शोच्यं भवेत् ।।
सकाळी सूर्य उगवतो. तो कमळांची वने फुलवतो, रात्रीचा अंधार दूर करतो आणि आपल्या तेजाने चंद्राला फिकट व निस्तेज करून टाकतो. दुपारी आपल्या प्रखर किरणांनी नद्यांतील पाणी (बाष्परूपाने) शोषून घेतो. पण तोच सूर्य संध्याकाळी अखेरीस अस्ताला जातो. मग त्याबद्दल शोक करण्यासारखे काय आहे? (हे स्वीकारावेच लागते).
यातून कवी सांगतो की या जगात कितीही महान, सामर्थ्यवान किंवा तेजस्वी व्यक्ती असली तरी तिलाही काळाच्या नियमापुढे झुकावे लागते. उदय आणि अस्त, यश आणि अपयश, वैभव आणि क्षय हे निसर्गाचे अटळ नियम आहेत. त्यामुळे कोणाच्याही पतनाबद्दल अति शोक करू नये, तसेच आपल्या वैभवाचा अहंकारही बाळगू नये. उत्कर्ष आणि अपकर्ष हे जीवनाचे अपरिहार्य नियम आहेत.





























































