मनतरंग – फोमो विरुद्ध जोमो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या सौदागर

‘फोमो – फिअर ऑफ मिसिंग आऊट’ फोमो ही एक गुंतागुंतीची मानसिक अवस्था ज्यामध्ये ‘मला कुठल्याही चांगल्या गोष्टी/संधींपासून वंचित राहायचं नाही ‘ किंवा ‘मला जर सर्वात सुंदर गोष्टी मिळाल्या नाहीत, तर मी कायमचा त्यांना मुकेन’ अशा प्रकारची संदर्भहीन विचारधारणा त्या व्यक्तीला व्यापून टाकते.

ाविराज (नाव बदलले आहे) महत्प्रयासाने अभ्यासाला बसला होता खरा, पण त्याचं त्यात मन नव्हतं. त्याचे कान सतत बाहेरच्या खोलीकडे लागलेले होते. त्याची आई आणि बाबा दोघेही त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर चालले होते. ‘मला ही दोघं नेहमीच एकटं पाडतात’ हा विचार येताक्षणी तो एकदम चरफडला आणि त्याचक्षणी एक कल्पना त्याच्या डोक्यातून निघाली. त्यावर आता काम करायचंच असं ठरवून तो पुन्हा अभ्यासाला लागला.

त्याच दिवशी तो आई-बाबा बाहेर गेल्यावर तडक मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी निघून गेला. त्या वेळी त्याने फोन बंद ठेवला. त्याने फोन न उचलल्याने आईबाबा दोघेही अस्वस्थ झाले. जेव्हा बाबांनी त्याला विचारलं तेव्हा त्याने खरं तेच सांगितलं. अर्थातच बाबा त्याच्यावर चिडले.

विराजला समुपदेशनाला आणण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे त्याचं आई-बाबांना न सांगता एकटंच चित्रपटाला जाणं आणि बाहेरूनच खाऊन येणं. “आमच्यासाठी हे शॉकिंग आहे मॅम.’’ त्याच्या आईला हा धक्का पचवता येत नव्हता.
विराज हा खरे तर अष्टपैलू मुलगा होता. प्रचंड हुशार, अनेक कलांमध्ये तरबेज, खेळामध्ये प्रवीण, पण प्रचंड जिद्दीही होता. मग ते कुठलंही काम असो किंवा त्याच हट्ट. त्याच्या याच हट्टाला त्याचे आई-वडील कंटाळले होते. त्याचा हा हट्टीपणा त्या दोघांनाही नवीन नव्हता. मात्र विराजचे हट्ट वयानुसार वाढतच चालले होते. ‘मला सर्वोत्तम हवं. कारण माझ्या मित्रांकडे अमुक एक गोष्ट आहे’ हा हट्ट त्याचा अजूनही होता. किंबहुना तो आता आडमुठेपणामध्ये रूपांतरित झाला होता.

विराजचा मौजेकडे कल अलीकडे वाढला होताच, परंतु ती मिळाली नाही तर तो कमालीचा अस्वस्थ होत होता आणि आता तर त्याने त्याच्या बुद्धीनुसार त्यावर मार्गही शोधला होता. ‘हवीहवीशी गोष्ट कुठल्याही मार्गाने मिळवायची’ आणि त्यासाठी तो भरपूर धडपडत होता. त्याला कुठलीही मौजेची संधी सोडायची नव्हती. तो कुटुंबाबरोबर फिरायला जातानाही बऱयाच आडवाटांची ठिकाणं शोधे आणि आई-वडिलांना तिथे जाण्यासाठी प्रवृत्त करे. हॉटेलमध्ये गेल्यावर ‘बेस्ट’ अन्नपदार्थ खायला मिळावे म्हणून खटपट करत असे. सगळ्यात काळजीचा हा भाग होता की, या सगळ्या गोष्टी तो इंटरनेटवरून शोधत होता. त्यामुळे तासन्तास तो मोबाईलवर असायचा. “मला कुठेही काहीही मिस करायचं नाहीये’’ असा विराज जेव्हा स्वतहून म्हणाला तेव्हाच त्याची ‘फोमो – फिअर ऑफ मिसिंग आऊट’ची समस्या अधोरेखित झाली होती.

फोमो ही एक अशी गुंतागुंतीची मानसिक अवस्था आहे की, ज्यामध्ये ‘मला कुठल्याही चांगल्या गोष्टी/संधींपासून वंचित राहायचं नाही’ किंवा ‘मला जर सर्वात सुंदर गोष्टी मिळाल्या नाहीत, तर मी कायमचा/ची त्यांना मुकेन’ अशा प्रकारची संदर्भहीन विचारधारणा त्या व्यक्तीला व्यापून टाकते आणि त्या गोष्टी निसटू नयेत म्हणून फोमो असलेली व्यक्ती पराकोटीची धडपड करते.

विराजचं उदाहरण जसं आपण पाहतोय तसंच फोमो असलेल्या व्यक्ती या कायम स्वतची तुलना इतरांसोबत करत असतात. मग त्या इतर व्यक्ती या त्यांच्या नात्यातल्या, मित्रपरिवारापैकी किंवा मग समाजमाध्यमांवरच्याही असू शकतात. ‘इतरांना मिळालेलं मला का नाही मिळू शकत?’ या विचाराने त्यांना त्रासायला होतं की कधी कधी त्या नैराश्यातही जाऊ शकतात किंवा मग घाईगडबडीत निर्णय घेऊन मोकळी होतात. अखंड तुलना आणि त्यातून येणारे नैराश्य व त्या नैराश्यातून मार्ग म्हणजे आततायीपणाचा मार्ग हे या फोमोग्रस्त व्यक्तींचे आयुष्य बनत जाते. विराजला फोमोपासून परावृत्त करून जोमोमध्ये त्याला आणणं गरजेचं होतं. ‘जोमो म्हणजे काय?’ हा प्रश्न विराजने अर्थातच विचारला.

‘जोमो म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आऊट’ हे उत्तर ऐकून तो अजूनच संभ्रमात पडला. ‘तुला सगळ्याच गोष्टी त्या निसटू नयेत म्हणून मिळवायच्या आहेत. आता समज की, तुला नवीन मूव्हीचं तिकीट मिळालं नाही, तर तो वेळ तू दुसऱया कुठल्यातरी गोष्टीसाठी देऊ शकतोस का?’ थोडा वेळ विचार करून विराज म्हणाला, “मी त्याऐवजी मित्रांसोबत राहीन किंवा मग घरीच टीव्हीवर काहीतरी पाहीन.’’ “म्हणजे तू तो मजेचा वेळ मजेसाठीच वापरलास ना’’ असं त्याला विचारल्यावर तो विचारात पडला. “पण मग मला मूव्ही?’’ “तुझा उद्देश जर मजा असेल तर ती मजा तू कशी अनुभवतोस यावर अवलंबून आहे. जर तू फक्त एकाच गोष्टीवर अडून बसलास तर तुला कायमच फोमोचा सामना करावा लागेल आणि त्यात तू अडकून बसशील. मात्र तू जोमो विचारधारणा मनात ठसवशील तर तू कायम आनंदी राहशील.’’

‘माझा उद्देश काय?’ याबरोबरच ‘मला आताच्या घडीला नक्की काय हवंय?’ हेही त्याला समजावून सांगण्यात आलं. कारण फोमोग्रस्त असलेल्या व्यक्तींची निर्णयक्षमता तसंच ध्येयक्षमता विकसित करण्यासाठी त्यांना तयार करावं लागतं. विराजच्या बाबतीत त्याचं तातडीचं उद्दिष्ट (दहावी परीक्षा), त्यासाठी लागणाऱया वेळेचं नियोजन, महत्त्वाचं उद्दिष्ट (मेहनत, सराव) आणि नंतर आवश्यक उद्दिष्ट (विश्रांती, ब्रेक) या बाबी त्याला सत्रांमध्ये समजावून सांगितल्या गेल्या, ज्यामध्ये जोमो ही संकल्पना त्याच्या लक्षात आणून दिली गेली. दृष्टिकोन बदलण्यासाठी त्याला त्याच्या अतार्किक विचारधारेतून बाहेर काढलं गेलं. त्यासाठी त्याला त्याच्या आवाक्यात असणाऱया गोष्टींकडे बघण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. ज्या त्याला स्वतलाच निवडायच्या होत्या. ‘चॉईस इज युवर्स’ हे वाक्य विराजला मनातून पटत चाललं होतं.
अर्थातच, निवड विराजची होती. कारण आनंद, समाधान हे त्याच्या आजूबाजूलाच होतं. फक्त त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी त्याला गवसली होती. आता विराज कुठलीही गोष्ट मिस करत नाही, तर मिस झालेली गोष्ट त्याच्यासाठी नव्हतीच असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला आनंदाची चावी मिळालीय. म्हणून ती तो सजगतेने मनाच्या तिजोरीलाच लावून ठेवतो आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आनंदाचा पेटारा उघडतो.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)