
>> राखी अरदकर
[email protected]
कधी कधी एखाद्या गावात पाऊल ठेवलं की वाटतं, इथे वेळ थोडासा थांबला आहे. जुन्या आठवणी, कथा, गाणी आणि संस्कृती अजूनही मातीच्या सुगंधासारख्या हवेत तरंगत आहेत. सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळजवळचं पिंगुळी हे असंच एक गाव. पिंगुळीची कला कथा सांगते, इतिहास जपते, संस्कृतीची ओळख करून देते, समाजाचा जीवनप्रवासही आपल्यासमोर उलगडते. पिंगुळीतील ठाकर समाजाने शतकानुशतके ही परंपरा जिवंत ठेवली आहे.
चित्रकथी हा शब्द ऐकला की लगेच मनात प्रश्न येतो. ही नेमकी कला आहे तरी काय? ‘चित्र’ आणि ‘कथा’ या दोन गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे चित्रकथी. कलाकार एकामागोमाग एक चित्र दाखवत कथा सांगतो, गातो, वाद्य वाजवतो आणि श्रोत्यांना एका वेगळ्याच काळात घेऊन जातो. आज आपण क्रीनवर कथा पाहतो. पण काही वर्षांपूर्वी हीच चित्रकथी गावोगावी फिरणारी जिवंत दृश्यश्राव्य कला होती.
असं सांगितलं जातं की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या कलेला विशेष महत्त्व प्राप्त झालं. गावोगावी फिरणारे चित्रकथी कलाकार, माहिती गोळा करणारे गुप्त दूतही होते. मनोरंजनाच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या भागात जात, लोकांमध्ये मिसळत आणि घडामोडींची माहिती घेऊन परत येत. त्यामुळे या कलेला सांस्कृतिकइतकंच ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्वही प्राप्त झालं. पिंगुळीतील ठाकर समाजाचा सावंतवाडीच्या भोसले घराण्याशीही जवळचा संबंध मानला जातो. पुढे सावंतवाडीच्या राजांनी त्यांना आश्रय दिला आणि त्यांच्या कलेच्या जतनासाठी मदत केली. त्यामुळे या समाजाने आपली कला, परंपरा आणि जीवनपद्धती टिकवून ठेवली.
चित्रकथीमध्ये वापरली जाणारी चित्रे ही विशेष असतात. राजे-महाराजे, रामायण-महाभारतातील प्रसंग, देव-देवता, राक्षस, युद्धदृश्ये यांची हाताने काढलेली चित्रे जाड कागदावर रेखाटली जातात. एकाच कथेसाठी अनेक चित्रांचा संच तयार केला जातो. ही चित्रे रंगीत, ठळक आणि दूरवरून स्पष्ट दिसतील अशी असतात. पात्रांचे डोळे मोठे, चेहरे बाजूने दाखवलेले आणि भाव स्पष्ट असतात. कारण रात्री मशालीच्या किंवा दिव्याच्या मंद प्रकाशात शेवटच्या प्रेक्षकालाही ती नीट दिसली पाहिजेत. पूर्वी या चित्रांसाठी रंगही निसर्गातूनच तयार केले जात. झाडांची पाने, फुलांचा रस, माती, खनिज दगड, डिंक यांचा वापर करून रंग बनवले जात. म्हणूनच अनेक जुनी चित्रे आजही टिकून आहेत. त्यांच्याकडे पाहताना जणू एखादा जुना काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. पिंगुळीची कला चित्रकथीपुरती मर्यादित नाही. इथल्या ठाकर समाजाने अनेक लोककला जिवंत ठेवल्या आहेत. त्यात कळसूत्री बाहुल्या विशेष प्रसिद्ध आहेत. लाकडापासून बनवलेल्या बाहुल्यांना दोऱयांनी हलवत कथांचे सादरीकरण केले जाते. पडद्यामागे बसलेला कलाकार बोटांच्या हालचालींनी त्या बाहुल्यांना जिवंतपणा देतो. याचबरोबर चामड्याच्या बाहुल्यांचा सावलीखेळ ही एक सुंदर परंपरा आहे.
यासाठी विशेष उल्लेख करावा लागेल लोककलाकार ‘पद्मश्री’ परशुराम विश्राम गंगावणे यांचा. सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील ठाकर आदिवासी समाजात जन्मलेल्या गंगावणे यांनी आयुष्यभर चित्रकथी या प्राचीन लोकपरंपरेच्या जतनासाठी स्वतला वाहून घेतले. सुमारे 500 वर्षे जुनी मानली जाणारी ही कथाकथन कला काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. परंतु त्यांनी अथक प्रयत्नांनी तिला पुन्हा जिवंतपणा दिला. चित्रकथीमध्ये रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांतील कथा आवाजातील चढ-उतार, लोकसंगीत, शैलीदार चित्रे तसेच दोरी आणि छाया बाहुल्या यांसारख्या दृश्राव्य माध्यमांच्या सहाय्याने सादर केल्या जातात. या कलेचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या आजीवन समर्पणाची दखल घेत भारत सरकारने 2021 साली त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
आज जर कोणाला चित्रकथीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर कुडाळजवळील पिंगुळी गावाला भेट देता येते. गावातील लोककला अंगणात बसून कलाकारांकडून जिवंत चित्रकथी अनुभवता येते. बाहुल्या आणि चित्रे कशी तयार केली जातात हे समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे पिंगुळी हे लोकपरंपरेचा जिवंत वारसा अनुभवण्याचे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.




























































