
जूनअखेरपर्यंत ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार बरसायला सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू असल्याने हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारपर्यंत हीच स्थिती राहणार असून मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे उद्याचा रविवार मुंबईकरांना घरात बसूनच काढावा लागणार आहे. तर सोमवारीही अलर्ट असल्याने घरूनच काम करणे भाग पडणार आहे.
घराबाहेर पडू नका!
राज्यात एमएमआर, ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकचा काही भाग या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागांमध्ये येत्या 6 जुलैपर्यंत सातत्याने मुसळधार पाऊस आणि वादळेदेखील येतील असे हवामान विभागाचे अलर्ट आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवास टाळता आला तर टाळावा. हवामान विभागाच्या अलर्टनुसारच वागावे, घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. धोका असलेल्या भागातील लोकांना दर तीन तासांनी अलर्टचा मेसेज पाठवला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
































































