
देशातीलच नव्हे तर जगभरातील हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असलेल्या अयोध्येच्या पवित्र श्रीराम मंदिरातील देणग्यांवर भाजपशी संबंधित मंडळींनी मारलेला डल्ला, राक्षसी बहुमतासाठी शिवसेना व तृणमूल काँग्रेसमधून करण्यात आलेली खासदारांची चोरी, या मुद्दय़ांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठे रणकंदन पहायला मिळणार आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजीजू यांनी आज ‘एक्स’ पोस्टद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन बोलावण्याबाबत सरकारला सूचित केले आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. सुमारे चार आठवडे चालणाऱया या अधिवेशनात मोठा गदारोळ होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असेल.
‘ऑपरेशन सिंदूर’चे सत्य
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये एकही हिंदुस्थानी जवान शहीद झाला नाही, अशी माहिती सरकारने दिली होती. प्रत्यक्षात सहा जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे सरकारचा खोटेपणा उघड झाला. त्यावरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व सरकारला प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागणार आहे.
लोकसभा मतदारसंघ फेररचना
मागील अधिवेशनात फेटाळले गेलेले लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयक सरकारकडून पुन्हा मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत भाजप आणि मित्रपक्षांनी विरोधी पक्षांतील खासदारांची फोडाफोडी केली आहे. त्यामुळे कागदावर एनडीएचा आकडा वाढला आहे. त्या जोरावर हे विधेयक रेटण्याचा प्रयत्न सरकारकडून होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक मंजूर व्हावे यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
विरोधकांचे लक्ष्य मोदी व्हाया चंपत राय
राम मंदिरातील देणगी चोरीमुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बॅकफूटवर आहे. पंतप्रधान मोदी यांनीच नेमलेले राम मंदिराचे ट्रस्टी चंपत राय यांची भूमिका संशयास्पद असल्याने खुद्द पंतप्रधान मोदी अडचणीत सापडले आहेत. चंपत राय या विषयावरून विरोधक पंतप्रधानांना लक्ष्य करतील, अशीच चिन्हे आहेत.


























































