
शेतकऱ्यांना 30 जूनच्या आत कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणारे सरकार शब्द पाळू शकलेले नसताना ही कर्जमाफी आणखी लांबणार असल्याचे समोर आले आहे. शेतकरी कर्जमाफीवर चर्चा सुरू आहे. राज्यपालांची सही बाकी आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ 5 जुलैनंतरच मिळणार असल्याचे खुद्द कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केले.
मंत्री भरणे बारामती येथे आयोजित एका सभेत बोलत होते. यावेळी कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत ते म्हणाले की, सरकारने इन्कम टॅक्सकडे शेतकऱ्यांची माहिती मागितली आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार नाही. या प्रक्रियेला थोडा वेळ जाणार आहे. मात्र कर्जमाफी निश्चित देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इन्कम टॅक्सच्या संदर्भात माहिती आल्यानंतर आठ दिवसांत कर्जमाफी होणार असल्याचे भरणे म्हणाले. ही कर्जमाफी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




























































