साताऱ्यात पावसाचा जोर; पश्चिम भागात मुसळधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यात पावसाचा जोर वाढला असून, पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांत मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते, पूल यांची अवस्था दयनीय झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावाजवळील डोंगर खचल्याने तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. तारळी खोऱयात नवीन पुलाच्या कामामुळे बांधलेल्या तात्पुरत्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने भागातील 10 गावांचा मुख्य मार्गांशी संपर्क तुटला आहे.

जुलै महिना सुरू झाल्यापासून जिह्यात पावसाला सूर गवसला असून, गेले दोन दिवस संततधार सुरू आहे. जिह्याच्या पश्चिम भागात धुवाँधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयनेसह प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत कोयनानगरला 189, नवजाला 210, तर महाबळेश्वरला 233 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणात पाण्याची आवक प्रतिसेकंद 25 हजार क्युसेक्सच्या वर गेली आहे. धरणातील पाणीसाठा 24 तासांत 2.16 टीएमसीने वाढून 19.11 टीएमसीवर पोहोचला आहे.

तरळीवरील पूल पाण्याखाली

पाटण तालुक्यातील तारळी नदीवरील नवीन पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे तारळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे अपूर्ण पुलालगत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे कोंजवडे, काटेवाडी, कडवे, कडवे खुर्द, सावरघर, नुने, महाडिकवाडी, जाधववाडी, दुटाळवाडी आणि सासपडे या गावांचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटला आहे.

एकीव धबधबा वाहू लागला

पाचगणी ः सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या जावळी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावताच येथील धबधबे पुन्हा एकदा जिवंत झाले आहेत. जावळी तालुक्यातील एकीव गावाच्या हद्दीतील प्रसिद्ध एकीव धबधबा मुसळधार पावसामुळे फेसाळत ओसंडून वाहू लागला असून, त्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच कास परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे ओढे, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहू लागले असून, संपूर्ण परिसराला पावसाळी पर्यटनाची नवी उभारी मिळाली आहे.