
वांद्रे येथील गरीब नगरमधील 100 अधिकृत झोपड्यांचे कुर्ल्यात पुनर्वसन केले जाईल. 15 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती एमएमआरडीएने उच्च न्यायालयात दिली.
एमएमआरडीएचे वकील अक्षय शिंदे यांनी ही माहिती न्या. मनीष पितळे व न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाला दिली. प्रकल्पबाधितांसाठी कुर्ला येथे इमारती आहेत. तेथे या 100 अधिकृत झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यातील 16 झोपडीधारकांचे एचडीआयएल इमारतीत 15 जुलैपर्यंत तर उर्वरित 84 जणांचे स्वातंत्र्य दिनापर्यंत भंडारी इमारतीत पुनर्वसन केले जाईल, असे अॅड. शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचे प्रतिज्ञापत्रही एमएमआरडीएने सादर केले.
गरीब नगरवर गेल्या महिन्यात बुलडोझर फिरवण्यात आला. या कारवाईत आमच्या अधिकृत झोपड्यांचे नुकसान झाले आहे. या झोपड्यांची डागडुजी करण्यास परवानगी द्यावी. आमची वीज व पाणी कारवाईत बंद करण्यात आले आहे. पुनर्वसन होईपर्यंत आमची वीज व पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी करणारी याचिका या झोपडीधारकांनी केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने या झोपडीधारकांची वीज व पाणी पूर्ववत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुढील सुनावणी 7 जुलैला होणार आहे.




























































