
फिफा वर्ल्ड कपमध्ये शांतपणे पण दमदार वाटचाल करणाऱ्या कोलंबियाने घानाचा १-० गोल फरकाने पराभव करत उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ १६) फेरीत दिमाखात प्रवेश केला. जॉन आरियासच्या सुरुवातीच्या गोलने सामना खिशात घातल्यानंतर कोलंबियाच्या अभेद्य बचावफळीने घानाचे सर्व प्रयत्न उधळून लावत विजयावर शिक्कामोर्तब केले. आता पुढील फेरीत त्यांची गाठ स्वित्झर्लंडशी होणार आहे.
कॅन्सस सिटीतील तब्बल ३० अंश सेल्सिअस तापमानात झालेल्या या सामन्यात कोलंबियाने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. आठव्या मिनिटालाच जॉन कॉर्डोबा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने लुईस सुआरेझला मैदानात उतरावे लागले. मात्र, हा बदल कोलंबियासाठी वरदान ठरला. १४व्या मिनिटाला सुआरेझने उजव्या बाजूने टाकलेल्या अचूक क्रॉसवर जॉन आरियासने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टच्या खालच्या कोपऱ्यात धाडला आणि कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून
दिली. हा गोलच अखेर सामन्यात निर्णायक ठरला.
विश्वचषकात आतापर्यंत फारशी चर्चा न झालेल्या कोलंबियाने मात्र आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पोर्तुगाल, उझबेकिस्तान आणि डीआर काँगो यांना मागे टाकत गट ‘के’मध्ये अव्वल राहिलेल्या कोलंबियाने बाद फेरीतही आपली विजयी लय कायम राखली.
सामन्यात हजारो कोलंबियन समर्थकांनी स्टेडियमला अक्षरशः ‘मिनी बारांक्विला’चे स्वरूप दिले होते. पिवळ्या जर्सी, पारंपरिक ‘सोम्ब्रेरी वुएल्तियाओ’ टोपी आणि अखंड घोषणांनी संपूर्ण वातावरण कोलंबियामय झाले होते. ‘चला कोलंबिया, आजचा विजय आपलाच’ अशा घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले.
कोलंबियाचा स्टार आक्रमक लुईस डायाझने अनेकदा घानाच्या बचावफळीची परीक्षा घेतली. पहिल्या सत्रात त्याचा फटका साईड नेटिंगला लागला, तर दुसऱ्या सत्रात त्याने केलेला गोल ऑफसाइडमुळे रद्द ठरला. तरीही कोलंबियाने सातत्याने आक्रमणाचा मारा कायम ठेवला. घानाचा गोलरक्षक लॉरेन्स अटी-झिगीने अखेरपर्यंत अप्रतिम बचाव करत पराभवाचे अंतर वाढू दिले नाही. दुसरीकडे, घानाचा सर्वात धोकादायक आक्रमक अँटोनी सेमेन्योला कोलंबियाच्या शिस्तबद्ध बचावफळीने एकही स्पष्ट संधी मिळू दिली नाही. २०१४ मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणे ही कोलंबियाची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी होती. आता हा संघ स्वित्झर्लंडविरुद्ध विजय मिळवत इतिहास घडवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.































































