एनडीआरएफ आणि एसडीआरएफला दीड कोटीचा निधी, दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पंधरा कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी या दोन्ही दलांना दीड कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मान्सून कालावधीत राज्यातील पूरप्रवण तसेच भूस्खलनप्रवण जिल्हे निश्चित करून संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दलाच्या तुकड्यांना तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिसाद दलाच्या पथकांना तैनातीदरम्यान जेवण, निवासाची व्यवस्था, वाहन व्यवस्था इतर खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.

दहा जिल्ह्यांना प्रत्येकी पंधरा कोटी

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशीव, नांदेड व गडचिरोली या जिल्ह्यातील प्रत्येक तुकडीला पंधरा कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने घेतला आहे.

एनडीआरएफ म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ही देशाची प्रमुख आपत्कालीन बचाव यंत्रणा आहे. एनडीआरएफच्या देशात एकूण सोळा बटालियन असून महाराष्ट्र पुणे व गोव्यासाठी पाचवी बटालियन आहे. पूर, दरड कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या तुकड्या मुंबईसह रायगड, ठाणे अशा राज्यातल्या विविध भागांत तैनात केल्या जातात. प्रत्येक बटालियनमध्ये 18 स्वतंत्र बचाव पथके असतात. त्यात इंजिनीयर, तंत्रज्ञ आणि प्रशिक्षित डॉग स्क्वॉड असतो. या तुकड्यांकडे अत्याधुनिक बोटी, कटर, जॅक आणि पूरनियंत्रण साहित्य असते.

राज्यात पूर आणि अतिवृष्टीच्या काळात बचाव व मदतकार्यासाठी एसडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या जातात. आपत्कालीन परिस्थितीनुसार या तुकड्यांची संख्या बदलत असते. मागील अतिवृष्टीच्या काळात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या सतरा तुकड्या तैनात केल्या होत्या. महाराष्ट्रातील चक्रीवादळाच्या काळात एसडीआरएफच्या सहा तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या.