
कोल्हापूर जिह्यात आज चौथ्या दिवशीही सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल दहा फुटांची वाढ झाली असून, 20हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगेची पातळी 24 फूट 8 इंच झाली होती.
दरम्यान, धरणक्षेत्रातही समाधानकारक पाऊस होत असून, चंदगड तालुक्यातील 1.56 टीएमसी क्षमतेचे घटप्रभा धरण आज सकाळी ओव्हरफ्लो झाले. राधानगरीसह उर्वरित धरणेही 25 टक्क्यांहून अधिक भरली आहेत. 25 टीएमसी क्षमतेचे दुधगंगा धरण केवळ पाच टक्के भरले आहे.
कोल्हापूर जिह्यात सलग चार ते पाच दिवस अधूनमधून विश्रांती घेत मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पावसाची संततधार सुरू असून, धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस कोसळत असल्याने नद्या, नाल्यांच्या पात्रातही पाणीपातळी वाढत चालली आहे.
मनपाचा गलथान कारभार; पुन्हा झाड कोसळले
दोन दिवसांपूर्वी ताराबाई पार्क परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत मोठे झाड कोसळले होते. यामध्ये चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने काहीजण जखमी झाले, तर आज पुन्हा एकदा राजारामपुरी परिसरात गजबजलेल्या मुख्य मार्गावर जुने भले मोठे झाड कोसळले. यामध्येही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. शहरात अशी अनेक मोठी झाडे असून, त्यांच्या फांद्या समप्रमाणात छाटल्या नसल्याने ती केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. याबाबत वारंवार महापालिकेला कळवूनही संबंधित विभागाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. एखादा बळी गेल्यानंतरच जाग येणार आहे का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा महिला संघटिका व मनपा गटनेत्या प्रतिज्ञा उत्तरे यांनी केला आहे.
‘एनडीआरएफ’कडून जनजागृती, बोट प्रशिक्षण
n संभाव्य पूर व नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) टीम-5 ई तर्फे जनजागृती व बोट प्रशिक्षण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना पूर, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, स्वतःची व इतरांची सुरक्षितता तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कमांडर इन्स्पेक्टर महेश शिंदे, इन्स्पेक्टर अजय यादव यांच्यासह संपूर्ण पथक उपस्थित होते.
मुळा पाणलोटात संततधार; पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो
अहिल्यानगर, दि. 4 (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने मुळा नदीवरील अंबितपाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण तीन दिवसांपूर्वी भरले त्यानंतर शुक्रवारी 600 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले. या वर्षीच्या पावसाळ्यात अकोल्यातील हे दुसरे धरण भरले आहे. पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा आता राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावला आहे.
हिरण्यकेशीवरील पूल व रस्ता वाहून गेला!
गडहिंग्लज ः गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगावनजीक हिरण्यकेशी नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने नदीपात्रातून काढण्यात आलेला पर्यायी रस्ता शुक्रवारी दमदार पावसाने खचला होता. आज दुपारी हा पूल व पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, जुलैअखेर पूल होऊन वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे भडगाव-महागावसह चंदगड मार्गावरील वाहतूक किमान तीन आठवडे बंद राहण्याची शक्यता आहे. भडगावनजीक हिरण्यकेशी नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जानेवारीमध्ये या कामास सुरुवात झाली. तेव्हापासून चंदगड मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे सुरू होती. पावसाने शुक्रवारी पर्यायी रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून आजारामार्गे वळविण्यात आली होती.




























































