
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नावली गावातील अनेक ठिकाणच्या जमिनीला मोठय़ा प्रमाणात तडे जाऊन भूभाग खचण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेत शेतजमिनी, घरे आणि अंतर्गत रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असून, प्रशासनानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत पाहणी सुरू केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने मातीची पकड सैल झाली आणि नावली गावातील डोंगरउतारावरील अनेक भाग खचू लागले आहेत. शेतजमिनीला मोठमोठय़ा भेगा पडल्या असून, काही ठिकाणी जमीन सरकल्याचे चित्र आहे. याचबरोबर अनेक घरांच्या भिंतींना आणि अंगणांना तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने वाहनांची वाहतूक धोकादायक बनली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जमिनीला तडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. सुरुवातीला किरकोळ भेगा दिसत होत्या; मात्र पावसाचा जोर वाढल्यानंतर त्या अधिक रुंद झाल्या आहेत. काही घरांच्या भिंतींनाही तडे गेल्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी सुरू केली आहे.
प्रशासनाकडून पाहणी सुरू
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱयांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्राथमिक पंचनामे सुरू केले आहेत. जमीन खचण्याचे नेमके कारण आणि धोका किती गंभीर आहे, याचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भ तज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. प्रशासनाने धोकादायक भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, आवश्यक वाटल्यास तातडीने स्थलांतर करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना धोकादायक भागात जाणे टाळावे, घरांमध्ये तडे दिसल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी आणि अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. सध्या प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, नुकसानाचे अंतिम स्वरूप पाऊस ओसरल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.




























































