
तब्बल 29 वर्षांहून अधिक काळ मोगलांच्या प्रदीर्घ कैदेतून सुटका झाल्यानंतर 4 जुलै 1719 रोजी महाराणी येसूबाई साहेबांचे राजधानी साताऱ्यात आगमन झाले होते. या अभूतपूर्व ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून शनिवारी साताऱ्यात 307 वा ‘शौर्य आगमन दिवस’ अत्यंत उत्साहात आणि विनम्रतेने साजरा करत महाराणी येसूबाईंच्या स्मृती जागवल्या.
महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पुढाकाराने संगम माहुली ग्रामपंचायत आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णा-वेण्णा नदीच्या पवित्र संगमावर असलेल्या संगम माहुली येथील ‘महाराणी येसूबाई साहेब समाधीस्थळ’ या ठिकाणी हा सोहळा पार पडला. हे समाधीस्थळ नुकतेच ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित झाल्याने यंदाच्या सोहळ्याला एक वेगळेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते.
समाधी पूजन, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके
सोहळ्याची सुरुवात शिववंदनेने झाली. फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के आणि मान्यवरांच्या हस्ते महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणाऱ्या मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके ही या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. याप्रसंगी संगम माहुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून इतिहास जाणून घेतला.
या सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, संग्राम बर्गे आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली, तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि पत्रकार हरीश पाटणे यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिज्ञासा संस्थेचे विक्रांत मंडपे, योगेश चौकवाले, जयश्री चौकवाले, नीलेश पंडित, नीलिमा पंडित, निशांत पंडित, धनंजय खोले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने, उपसरपंच कोळपे यांच्यासह तमाम माहुली ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी आपली उपस्थिती नोंदवली.
अभिवादनासाठी शिवप्रेमींची गर्दी
समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी साताऱयातील प्रतिष्ठत नागरिक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. इतिहासप्रेमी जनसागराने अवघा समाधी परिसर गजबजून गेला होता. महाराणी येसूबाई साहेबांच्या अतुल्य आणि अभूतपूर्व त्यागामुळेच कठीण काळात स्वराज्याला नवसंजीवनी मिळाली, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




























































