विज्ञान रंजन – मयूर आणि चातक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

पाऊस सुरू झालाय. पावसाचं आणि अनेक पक्ष्यांचं नातं गहिरं आहे. पावशा पाऊस येत असल्याची वर्दी देतो आणि ‘नभ मेघांनी आक्रमिले’ की आपला देखणा पिसारा फुलवून मोर बेफाम होऊन नाचतो. नुकत्याच दिवंगत झालेल्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या ‘केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर’ या गाण्याची आठवण झाली. साधारण पन्नासेक वर्षांपूर्वी सांगलीला आजोळी गेलो असताना तिथल्या तात्यासाहेबांच्या माळावर वळिवाच्या पावसाळी ढगांचा गडगडाट कानी येताच बेभान नाचणारा मोर आम्ही पाहिला होता. त्याचं ते ‘थुई थुई’ चालणं तासभर चाललं होतं. मान उंचावून तीव्र स्वराच्या ‘केकारवा’चा सांगावा आभाळापर्यंत धाडण्याची त्याची आस जाणवत होती.

पुणी म्हणेल यात ‘रंजन’ असेल, पण विज्ञान? उत्तर असं की, प्रत्येक गोष्टीमागे दडलेलं ‘विज्ञान’ शोधावं लागतं. हिंदुस्थानात सर्वत्र आढळणाऱया आणि म्हणूनच राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचं आणि पावसाचं वैज्ञानिक नातं म्हणजे, पावसाळा हा मोरांचा मीलनाचा ऋतू असतो. पावसाळी ढग दाटून आले की वातावरणात निर्माण होणारी आर्द्रता आणि सभोवतालच्या ‘बॅरोमेट्रिक प्रेशर’मधला बदल (हवेचा दाब) या दोन्ही गोष्टी नर मोराच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱया असतात. त्याच्या या तीव्र स्वरात कोकिळाच्या पुजनासारखी मधुर, आर्जवी आळवणी नसते, पण एक प्रकारचा बेधुंदपणा मात्र असतो. तो त्याच्या वेगवान नृत्यातून आणि एकूणच देहबोलीतून प्रकट होतो. पाश्चात्यांना तो स्वर ‘बू-ग्रिल’ असा वाटतो, तर ‘केक’ म्हणजे मोर. त्याचा ‘रव’ किंवा ध्वनी तो केकारव. या ‘स्वरसाधनेतून’ मोर लांडोरांना (मादी) साद घालतात आणि ठरावीक प्रदेशात आपलंच ‘अधिपत्य’ आहे असंही सुचवतात. विराट निसर्ग निर्हेतूक असला तरी त्याच्या प्रत्येक सजीव निर्मितीला हेतू असतात. आपली प्रजाती वाढवणे हा त्यातला मुख्य हेतू असतोच. याशिवाय ‘केकारवा’मागचे दुसरं कारण म्हणजे एखादा शिकारी प्राणी आसपास असल्याचं आपल्या बांधवांना सांगून त्यांना सावध करण्याचं.

मोरासारख्या मोठय़ा आकाराच्या पक्ष्यांना ‘पिकाउल’ अशी संज्ञा आहे. त्यापैकी नर म्हणजे मोर किंवा पिकॅाक आणि लांडोर म्हणजे पिहेन. हिंदुस्थानी नर मोर मुख्यत्वे निळय़ा अंगाचा आणि हिरव्या ठिपक्यांचा सुंदर पिसांचा मोहक पिसारा फुलवणारा, बेताचं उडणारा, मुख्यत्वे जमिनीवरच डौलात चालणारा असतो. आपल्याकडे चिंचोळी गावात (पुण्याजवळ) इतके मोर आहेत की पाहायला पर्यटक येतात. या गावाला मोरांची चिंचोळी असंच म्हणतात. राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात त्यांची वस्ती अफाट. घराघरांवर आणि अंगणात मोरांचं बागडणं तिथे पाहायला मिळतं. जयपूरच्या गेटोर भागात तर एकदा मागच्या टेकडय़ांवरून उतरणारी शेकडो मोरांची रांग नेत्रसुखद वाटली होती.

एरवी मिटवलेला भरदार पिसारा मोर त्याच्या मीलनकाळी फुलवतो आणि तीव्र स्वरांच्या साथीने नाचू लागतो. नेटवर वगैरे त्याचं असं नृत्य पाहता येईल. मोरांचं निळसर-काळपट ‘डोळा’ असलेलं पीस मिळवून वहीत ‘बुकमार्प’सारखं ठेवण्याचा आमचा बालपणीचा उद्योग असायचा. मोरपिसाऱ्यातील या पिसांना ‘ट्रेन फेदर्स’ म्हणतात. पिसारा फुलला की त्यांची लांब ‘देठं’ दिसून येतात. मोर 4 ते 6 किलो वजनाचा पक्षी असून तो 15 ते 30 वर्षांपर्यंत जगतो. प्राणिसंग्रहालयातले सुरक्षित मोर जास्त जगतात. जंगलात राहणाऱयांना शिकार होण्याची भीती असते. शेतातील धान्य, कीटक आणि सरपटणारे लहान जीव हे मोरांचं खाद्य. पाऊस किंवा वर्षारंभ हा त्यांचा आवडता ऋतू.

यावेळी लांबलेल्या पावसाची आपण ज्या पक्ष्याप्रमाणे वाट पाहिली तो चातक पक्षी म्हणजे कोकिळ प्रजातीचा ‘जॅकोबिन कपू.’ उत्तर हिंदुस्थानात हे पक्षी प्रजोत्पादनासाठी उन्हाळय़ात येतात. दक्षिण आफ्रिकेतून त्यांचा आपल्या देशापर्यंतचा प्रवास केवळ तीन दिवसांत झाला की ते काटेरी घरटी बांधून राहतात. मीलनाचा संदेश देण्यासाठीच ते मान उंचावून चोच वासून ध्वनिसंदेश देतात. ते पाहून चातक केवळ पावसाचंच पाणी चोच वासून पितो अशी कविकल्पना कोणाला तरी स्फुरली असावी. चातकाचे पंख लांबलचक असतात. सुमारे 60 ते 70 ग्रॅम वाजनाचा चातक 6 ते 8 वर्षे जगतो. त्यामुळे एखाद्या जागी तो ठरावीक ऋतुमानात अनेकदा दिसू शकतो. हा स्थलांतरित पक्षी केवळ त्याच्या वैशिष्टय़पूर्ण हालचालींमुळे किंवा वागणुकीमुळे (बिहेवियरल पॅटर्नमुळे) साहित्यातील कल्पनाचित्रात अवतरला. हा पक्षी दवबिंदू शोषून घेतो तसंच झऱयाचं पाणीही पितो. केवळ पावसाच्या थेंबासाठी तिष्ठत नाही.

पावसाशी निगडित तिसरा आणि ‘अशुभ’ वगैरे मानला गेलेला आणखी एक पक्षी म्हणजे टिटवी. ‘रेड वॉटल्ड लॅपविंग.’ म्हणजे टिटवी पक्षी 35 सेंटीमीटर लांबीचे तसंच काळपट तपकीरी अंगरंगाचे असतात. नर टिटव्यांचे पंख पाच सेंटीमीटर अधिक लांब असतात. या पक्ष्याचा आणि पाणथळ जागेचा जवळचा संबंध. फार पूर्वी एका पक्षी निरीक्षकाने सांगितलं होतं की, पुढे दुष्काळ पडणार असेल तर टिटवी नदीच्या पात्रातील खडकावर मातीचं घरटं बांधते. इतकं या पक्ष्याचं जलसान्निध्य. अर्थात असा दुष्काळी संकेत देणाऱया (आणि खरं तर सावध करणाऱया) या पक्ष्याला ‘अशुभ’ मानलं गेलं असेल. पौर्णिमेच्या किंवा चांदण्या रात्री ते मीलन संकेताचे ध्वनी काढतात. कदाचित म्हणूनच ते अप्रिय असतील. अशी ही पावसाशी निगडित पक्ष्यांची त्रोटक कहाणी. ती वाचताना बराच लांबलेला पाऊस संततधारांनी बरसत असावा आणि मयुर सुखावला असावा अशी अपेक्षा.