
पावसाळापूर्व कामांबाबत शिवसेनेसह विरोधकांनी पावसाळ्याआधी नाराजी व्यक्त करीत बेजबाबदार कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासनाकडून पावसाळापूर्व तयारी झाल्याचा दावा करण्यात आला होता. असे असताना वारंवार दुर्घटना का घडत आहेत? असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेत्या, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, पावसाळापूर्व कामांबाबत मुंबईकरांमध्ये नाराजी असल्यामुळे पालिकेची विशेष सभा घ्यावी, यासाठी महापौर रितू तावडे यांना ३० मार्च रोजी आपण आणि स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी पावसाळापूर्व तयारीबाबत विशेष सभा घेण्यासाठी पत्र दिले होते. अशा महासभेत सर्वच नगरसेवक नालेसफाई, झाडांची काळजी, धोकादायक ठिकाणे आणि पावसाळापूर्व कामांबाबत प्रश्न उपस्थित करून सूचनाही सुचवतात. मात्र, पालिकेच्या कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या महापौरांनी ही सभा घेतली नाही. मुंबईकरांच्या जिवाच्या दृष्टीने विरोधकांच्या मागणीनुसार ही सभा घेणे किती महत्त्वाचे होते, हे आता घडणाऱ्या दुर्घटनांवरून लक्षात येते, असा टोलाही त्यांनी लगावला. अजूनही वेळ गेलेली नाही; सत्ताधाऱ्यांनी मनमानी करून मुंबईकरांच्या जिवाशी खेळणे बंद करावे, असेही त्या म्हणाल्या.





























































