
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पाऊस, दाट धुके आणि वेगवान वाऱयांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, पर्यटकांची मोठी गर्दी आणि खराब हवामानामुळे शहरासह महाबळेश्वर–पाचगणी मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली. गेल्या चार दिवसांत सुमारे 732 मि.मी. (सुमारे 28 इंच) पावसाची नोंद झाली आहे.
रांजणवाडी परिसरात एका इनोव्हा मोटारीवर झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महाबळेश्वर–तापोळा मार्गावरही झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. महाबळेश्वर नगरपरिषदेच्या कर्मचाऱयांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तत्परतेने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. सततच्या पावसामुळे वेण्णा नदीच्या सांडव्यावरील पाणी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचले असून, लिंगमळा परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साचून स्ट्रॉबेरी शेती पाण्याखाली गेली आहे. स्कूल मोहल्ला परिसरात गटाराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
शनिवार व रविवार सुटीचे दिवस असल्याने मुंबई, पुणे, गुजरातसह विविध भागांतून मोठय़ा संख्येने पर्यटक महाबळेश्वरात दाखल झाले आहेत. दाट धुके, मुसळधार पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी 82 मि.मी., 3 जुलै रोजी 186 मि.मी., 4 जुलै रोजी 266 मि.मी. आणि 5 जुलै रोजी 198 मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या चार दिवसांत सुमारे 732 मि.मी. (सुमारे 28 इंच) पावसाची नोंद झाल्याने महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज
महाबळेश्वर आणि परिसरात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून, अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील आणि स्थानिक नगरसेवकांनी संयुक्तपणे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरात उद्भवणऱया कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पालिकेची आपत्ती व्यवस्थापन पथक पूर्णपणे सज्ज आहे, असे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.
वेण्णा तलाव ओव्हरफ्लो
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.































































