विधिमंडळालाही पावसाचा फटका, विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पाऊस, जोरदार वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा परिणाम आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावरही झाला आहे. राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याने आणि हवामान विभागाने गंभीर इशारा दिल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून विधानसभेचे सोमवारी होणारे संपूर्ण कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात ही घोषणा केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षांनी सभागृहात काही मुद्दे उपस्थित केले आहेत. मात्र, राज्यात निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत गंभीर असून रविवारी सुमारे 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडे पडतात, मात्र यावेळी एका दिवसातच सुमारे 350 झाडे कोसळली. आजची परिस्थिती त्याहून अधिक गंभीर असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

आज दुपारनंतर 70 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडे घडलेल्या सर्व घटना दुर्दैवी आहेत. काल कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती. त्या इमारतीतील नागरिकांचा मृत्यू झाला नसून ती इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्याने तेथील नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनांकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहण्याची आवश्यकता आहे.

तरुणांना उद्देशून त्यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर धबधबे, घाट परिसर किंवा पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे. पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडणे जीवावर बेतू शकते, त्यामुळे जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. दुपारी 12 वाजता राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त मदतीची गरज भासेल तेथे तातडीने यंत्रणा पाठविण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत प्रशासन कमी पडणार नाही आणि जिथे काही कमतरता आढळेल ती तातडीने दूर केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.