
हिंदुस्थानी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला ग्रँड चेस टूरच्या क्रोएशिया टप्प्यात रॅपिड प्रकारातील शानदार कामगिरीची पुनरावृत्ती ब्लिट्झ प्रकारात करता आली नाही. ब्लिट्झच्या पहिल्या नऊ फेऱ्यांमध्ये त्याला केवळ 3.5 गुणांची कमाई करता आली. दुसरीकडे, फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत एकहाती आघाडी घेत विजेतेपदाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.
रॅपिडमध्ये संयुक्त आघाडीवर असलेल्या प्रज्ञानंदने ब्लिट्झमध्ये मात्र लय गमावल्याचे दिसून आले. दिवसाची सुरुवात त्याने जर्मनीच्या व्हिन्सेंट काइमरवर विजयाने केली. त्यानंतर नेदरलँड्सच्या अनीश गिरीविरुद्धची लढत बरोबरीत सुटली, मात्र त्यानंतर सलग चार पराभव स्वीकारावे लागल्याने त्याची घसरण झाली. दिवसअखेर आठ सामन्यांतून त्याने केवळ 3.5 गुण मिळवले आणि एकूण 15.5 गुणांसह तो चौथ्या स्थानावर घसरला.
दरम्यान, अलीरेझा फिरोजाने ब्लिट्झ प्रकारात वर्चस्व गाजवत नऊपैकी तब्बल आठ गुणांची कमाई केली. त्याच्या खात्यात आता 20 गुण असून, उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव आणि फ्रान्सच्या मॅक्सिम वाशिए-लाग्राव्ह या निकटच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा त्याने तीन गुणांची भक्कम आघाडी घेतली आहे.
विश्वविजेत्या डी. गुकेशलाही दिवस फारसा समाधानकारक ठरला नाही. त्याने प्रज्ञानंदपेक्षा अर्धा गुण अधिक मिळवत एकूण 14 गुणांसह पाचवे स्थान कायम राखले. सर्वात युवा विश्वविजेत्याला दिवसभरात चार पराभवांचा सामना करावा लागला. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक करत अलीरेझाने निम्म्याहून अधिक खेळाडूंना तब्बल सात किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी मागे टाकले आहे. जर्मनीचा व्हिन्सेंट काइमर 13 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्याच्या अर्धा गुण मागे अनीश गिरी असून, रोमानियाचा डीक बोगदान-डॅनिएल 11.5 गुणांसह पुढे आहे. नेदरलँड्सचा जोर्डन व्हॅन फॉरेस्ट त्याच्यापेक्षा दोन गुणांनी मागे आहे, तर यजमान क्रोएशियाचा इव्हान सारिक केवळ पाच गुणांसह तळाला आहे.
ब्लिट्झ प्रकारातील आणखी नऊ फेऱ्यांचा खेळ शिल्लक असला तरी अलीरेझाची आघाडी पाहता विजेतेपद जवळपास निश्चित मानले जात आहे.





























































