अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा, चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा ट्रस्टच्या बैठकीत मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. आज झालेल्या राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. देणगी चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एसआयटी चौकशी सुरू झाल्यानंतर या दोघांनीही राजीनामा दिला होता, जो आजच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. टीव्ही९ भारतवर्षने या यासंदर्भात वृत्त दिले आहे.

आज झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत, देणगी चोरीच्या या प्रकारामुळे देशभरात होत असलेल्या बदनामीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत दिनेंद्र दास यांना सांगण्यात आले की, आधी सरचिटणीस चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचा विषय मांडा, त्यावरही चर्चा केली जाईल. या बैठकीत गोपाळ राव यांनीही सहभागी होण्याचा प्रयत्न केला, मात्र सदस्यांनी त्यांना आत प्रवेश दिला नाही.

सध्या या प्रकरणाची जबाबदारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनाच घ्यावी लागेल, असा सूर ही बैठकीत उमटला. चंपत राय हे ट्रस्टमध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. ट्रस्टमध्ये आतापर्यंत जेवढ्याही नवीन नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सर्व चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्याकडूनच करण्यात आल्या होत्या. हा महत्त्वाचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला.

ट्रस्टच्या बैठकीत सहभागी झालेले स्वामी परमानंद गिरी यांनी सांगितले की, धर्माचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. जेव्हा लोक श्रद्धेने जोडले जातात, तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. देणगी चोरीच्या या आरोपांमुळे संपूर्ण देश दुखावला गेला असून यामुळे मोठी बदनामी होत असल्याचेही ते म्हणाले.