
पुणे जिह्यातील आळंदीत इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आळंदीमध्ये पूरस्थिती गंभीर होताच आळंदीतील विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या जवळपास 408 वारकऱ्यांना नगरपरिषदेच्या आपत्कालीन विभागाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
चारही पूल बंद; शहराचा संपर्क तुटला
इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीवरील पीएमपीएल बसस्थानकाजवळील जुना पूल, चाकण चौकातून देहू फाटय़ाकडे जाणारा पूल, सिद्धबेट परिसरातील पूल आणि पीएमपीएल बसस्थानकाजवळील नवीन पूल हे चारही पूल बंद करण्यात आले आहेत.




























































