
मानखुर्दच्या मंडाळा परिसरात अनधिकृत चार मजली इमारत शेजारच्या झोपडीवर पडून घडलेल्या दुर्घटने प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एक कंत्राटदार व झोपडीच्या मूळ मालकाला अटक केली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता.
मानखुर्दच्या न्यू मंडाळा येथील जनता नगरात रविवारी संध्याकाळी थरकाप उडविणारी दुर्घटना घडली होती. सदैव गजबजलेला असणाऱ्या या परिसरात अनधिकृतपणे उभी केलेली चार माळ्यांची इमारत बाजूच्या झोपडीवर कोसळली. परिणामी झोपडीतील सहा जणांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हाहाकार उडाला होता.
या प्रकरणी मोहम्मद मुख्तार अब्दुल अली शेख (५३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी इमारतीचे मालक, बांधकामाशी संबंधित कंत्राटदार, झोपडी मालक तसेच अनधिकृत बांधकामास जाणीवपूर्वक प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित खाजगी व शासकीय व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच कंत्राटदार अब्दुल वाहिद इद्रिसी व दुर्घटनाग्रस्त झोपडीचा मूळ मालक गुलाम रजा सय्यद अशा दोघांना अटक केली आहे.
दुर्लक्ष करणे महागात पडले
कोणतीही आवश्यक सुरक्षितता न पाळता अनधिकृत चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. इमारत गेल्या काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. तसेच शेजारील झोपडीमध्येही आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. परिणामी संबंधित चार मजली इमारत कोसळून शेजारील झोपडीवर पडून दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते.
मानखुर्दमध्ये घबराट, अनधिकृत बांधकाम ऐरणीवर
रविवारी अनधिकृत चार मजली इमारत शेजारच्या झोपडीवर पडून भयंकर दुर्घटना घडल्यानंतर मानखुर्दमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे.





























































