56 टक्केवारीमुळे ‘मिसिंग लिंक’ची पडझड झाली का? अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या महिन्याभरापूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याची घटना घडल्याने सरकारच्या विकासकामांच्या दर्जावर आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावरून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, ‘कंत्राटदार म्हणतात 56 टक्के आम्हाला द्यावे लागतात, त्यामुळे ही अवस्था झाली आहे का?’ असा सवाल केला. तसेच मिसिंग लिंकच्या कामाची तांत्रिक चौकशी, स्ट्रक्चरल ऑडिट करून या घटनेला जबाबदार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच मिसिंग लिंक दुर्घटना, मानखुर्द दुर्घटना, वारंवार झाडे कोसळल्याच्या घटना, पायाभूत सुविधांमध्ये असलेल्या त्रुटी यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. ‘महिनाही पूर्ण न झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दरड कोसळली. कोस्टल रोडलादेखील अशाच पद्धतीने गळती लागली आहे. मानखुर्दच्या दुर्घटनेत सहा जणांना जीव गमावला. दररोज झाडे कोसळतायत, मॅनहोलमध्ये पडून नागरिकांचा मृत्यू होतोय. पाऊस हा नैसर्गिक असला तरी अनेक दुर्घटनांना सरकारचे निकृष्ट दर्जाचे काम जबाबदार आहे,’ असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. सरकारने या संपूर्ण प्रकरणावर सभागृहात सविस्तर निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

झाडांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण करा – अनिल परब

पैसे उकळण्यासाठी छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये कोणतेही निकष न पाळता सिमेंटीकरण करण्यात आल्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन ती पडायला लागली आहेत. मुसळधार पावसामुळे अशा घटनांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पुढील दोन दिवसांत धोकादायक झाडांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.

या घटनांना सरकार, पालिका जबाबदार – सतेज पाटील

मुंबई, पुण्यात घडलेल्या घटनांना सरकार आणि पालिका जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला. भारतीय हवामान विभागाने 3 जुलैला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानंतरही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे येथे सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली नाही. ज्या घटना टाळू शकत होतो त्या टाळण्यातदेखील पालिकेला अपयश आले आहे. मानखुर्दमध्ये पडलेली इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती का? अशी विचारणा त्यांनी केली.