
सतत चार दिवस घुर्वाधार कोसळत असलेल्या पावसाने ठाणे जिल्ह्याला आजही जोरदार तडाखा दिला. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाड, शहापूर, बदलापूरला चांगलेच झोडपले. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. टिटवाळ्यात रस्ता खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून मीरा रोडमध्ये २४व्या मजल्यावरून बैठ्या चाळीवर बांधकाम साहित्य कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभर ठाणे जिल्ह्यात पावसाचा सूर टिपेला पोहचला होता. शाळांना सुट्टी असल्याने बच्चे कंपनीने चिंब आनंद लुटत ही सुट्टी एन्जॉय केली.
भिवंडी जलमय
रात्रभर बॅटिंग करीत असलेल्या पावसाने भिवंडी जलमय करून टाकली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मार्केट, तीन बत्ती बाजारपेठ, बंदर मोहल्ला, म्हाडा कॉलनी या भागांत चार फुटांहून अधिक पाणी होते. अनेक घरांमध्ये हे पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले.
शहापुरात शेती पाण्याखाली
शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा व मोडकसागर धरण परिसरात ६०० मिली मीटर एवढा पाऊस झाला. तुते गावातील पुलावरून पाणी वाहू लागल्याने साजिवली, सावरशेत, सरलांबे यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बीरवाडी, शिरगाव, कळमगाव, कुकांबे, कानविंदे या गावांमधील शेती पाण्याखाली गेली आहे.
सिमेंटचा पेव्हर ब्लॉक छतावर आदळला
काशिमीरा येथील गावठाण भागात विघ्नहर्त्या या २४ मजली इमारतीचे काम सुरू आहे. गच्चीवर ठेवलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक थेट बैठ्या चाळीवरील घरावर कोसळल्याने चार जण जखमी झाले. प्रियांका चौबे, सतीश चौबे, धर्मेश सोनी, संतोष जाधव अशी त्यांची नावे असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी शिरले
मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रात उल्हास नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने उपसा, पुरवठा पंप बंद करण्यात आले. त्यामुळे टिटवाळा, मांडा, शहाड, मोहने, आंबिवली परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
खर्डीजवळील दोन हजार ग्रामस्थांचा संपर्क तुटला
शहापुरातील फुगाळे-टोकरखांड रस्ता व शिरगाव येथील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने सुमारे दोन हजार ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.
कसाऱ्याच्या पुलावरून जिवघेणा प्रवास
कसाऱ्यातील वाशाळा ते फुगाळा या मार्गावरील पुलावर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली असून ग्रामस्थांनी कंबरेइतक्या पाण्यातून प्रवास केला. पुराचे पाणी आजूबाजूच्या गावातही शिरल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.
भिवंडीत मुलगा नाल्यात वाहून गेला
भिवंडीतील मोहम्मद अबुजार हा १३ वर्षाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत काकूबाई चाळ परिसरात असलेल्या नाल्याजवळ खेळत होता. अचानक तोल जाऊन नाल्यात पडल्याने तो बाहुन गेला आहे.
१३ विजेचे खांब पडले
सततच्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील किन्हवली भागात असलेले १३ विजेचे गंजलेले खांब पडले. या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नसले तरी सोगाव, आंबिवली, नडगाव, खरांगण, बोंडाळपाडा येथे दोन दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
ठाण्यात महाकाय होर्डिंग कोसळले
ठाण्याच्या पोखरण रोडवर महाकाय होडिंग कोसळले. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाले नाही. लुईसवाडी येथे मोठे झाड पडून पांडुरंग भुवड हे जखमी झाले. ठाणे शहरात आज दिवसभरात १२० झाडे उन्मळून पडली.






























































