
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मंगळवारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना घडली. येथील शाम नगर परिसरातील 200 फूट बायपासवर एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला फुगे विकणाऱ्या मुलांना चिरडले. या भीषण अपघातात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मृतदेहांची ओळख पटवणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रकचा वेग अत्यंत जास्त होता. अनियंत्रित झालेल्या या ट्रकने रस्त्यावरील लोखंडी कठडा तोडला आणि कडेला गटाराजवळ उभ्या असलेल्या मुलांना थेट धडक दिली. या जोरदार धडकेमुळे मुले गटारात फेकली गेली. या अपघातात तीन मुलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने ट्रक रस्त्यावरून हटवला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात मृतदेहांची प्रचंड दुरवस्था झाली असून, हे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.या लागोपाठ घडणाऱ्या दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




























































