मी भाजपचा सरपंच आहे, पण माझ्याच गावात रस्ता नाही! सरपंचाच्या आंदोलनावरून काँग्रेसचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असताना भाजप सरपंचाचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “मी भाजपचा सरपंच आहे, पण माझ्याच गावात रस्ता नाही,” असा संताप व्यक्त करत या सरपंचाने रस्त्यावरील चिखलात बसून प्रशासनाचा निषेध केला आहे. या घटनेचा आधार घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘राज्यात आणि केंद्रात सत्ता, तरीही विकास बेपत्ता!’ असे म्हणत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गावातील रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून शेतकऱ्यांचे अपघात होत आहेत. अखेर वैतागून या भाजप सरपंचाला रस्त्यावरील चिखलात बसून प्रशासनाचा निषेध करण्याची वेळ आली. आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्याला आणि लोकप्रतिनिधीला आंदोलनाचा इशारा द्यावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेसने लावून धरला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांची पोलखोल केली आहे.

काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल विचारला आहे की, जर तुमच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची ही अवस्था असेल तर, महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? यासोबतच, फडणवीस यांच्या सरकारमध्ये फक्त टक्केवारीच्या राजकारणात गुंतलेल्या लोकांचेच ‘अच्छे दिन’ आले आहेत, असा खोचक टोलाही काँग्रेसने लगावला आहे. एका भाजप सरपंचालाच आपल्या सरकारविरोधात चिखलात बसावे लागल्याने हा विषय सध्या राज्यात चांगलाच गाजत आहे.