राम मंदिर देणगी घोटाळ्या प्रकरणी जनतेत नाराजी, दोषींना फासावर लटकवण्याची मागणी – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम मंदिर देणगी गैरव्यवहारप्रकरणी केवळ ट्रस्ट सदस्यांचे राजीनामे स्वीकारून प्रश्न सुटणार नाही, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिली. या प्रकरणामुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले.

केजरीवाल म्हणाले की, राम मंदिरातील देणगीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. चोरी झाली नसती तर एवढ्या सहजपणे गुन्हा दाखल झाला नसता. तसेच या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यावरून गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, जनतेची एकच मागणी आहे की राम मंदिरातील देणगीचा गैरव्यवहार करणाऱ्यांना फासावर लटकवावे. केवळ राजीनामे घेऊन चालणार नाही, तर दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही धार्मिक देणग्यांमध्ये गैरव्यवहार करण्याचे धाडस करणार नाही.

देशातील अनेक मंदिरे आणि धार्मिक संस्थांवर “देणगी चोर” लोकांचा आणि त्यांच्या संघटनांचा ताबा असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. देशातील सर्व मंदिरे आणि धार्मिक संस्था त्यांच्या ताब्यातून मुक्त करून धर्मात्मे, संत आणि महंत यांच्या स्वाधीन करण्यात याव्यात, जेणेकरून त्यांचे पारदर्शक आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन होईल, असे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी विश्व हिंदू परिषदेवरही टीका केली. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांच्यावर आरोप होत असतानाही संघटना या कथित गैरव्यवहाराबाबत काहीही बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “चोरी झाली असेल तर त्याचा हिशोब द्या आणि दोषींना तुरुंगात पाठवा,” अशी मागणी करण्याऐवजी माझ्यावरच टीका केली जात आहे. हा मुद्दा उपस्थित करण्याचे धाडस मी कसे केले, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली.