
देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील वैजनाथ मंदिराच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे एक विशेष पथक मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी परळीत आले होते. या पाहणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. केंद्रीय पथकाने पाहणीनंतर वैजनाथ देवस्थान समितीला सुरक्षेत तातडीने सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
- बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक – वैजनाथ मंदिरात देवस्थान समितीने तात्काळ बंदूकधारी सुरक्षा रक्षक नेमावेत, ज्यामध्ये किमान एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असावा.
- मेटल डिटेक्टरची सोय – मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांच्या तपासणीसाठी मेटल डिटेक्टर बसवण्यात यावेत.
- स्वतंत्र सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष – मंदिर परिसरावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्यात यावा.
4 तास चालली सखोल पाहणी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असल्याने परळी वैजनाथच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. हीच बाब लक्षात घेऊन केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पथकाने तब्बल चार तास संपूर्ण वैजनाथ मंदिर परिसराची सखोल पाहणी केली. या वेळी पथकाकडून वैजनाथ मंदिर देवस्थानला मंदिराच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची अत्यंत गरज असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. आता या पथकाने दिलेल्या सूचनांची वैजनाथ देवस्थान समिती कधी आणि कशी अंमलबजावणी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पाहणी दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पथकातील एक अधिकारी आणि तीन कर्मचारी उपस्थित होते. तसेच वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, बीड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गट्टूवार, रमाकांत फड आणि विष्णू फड हे देखील उपस्थित होते.

पोलीस चौकी असूनही बंदूकधारी रक्षक नाहीत
सध्या वैजनाथ मंदिरात सुरक्षेसाठी 18 खाजगी कर्मचारी तैनात आहेत, परंतु ते बंदूकधारी नाहीत. तसेच मंदिर परिसरात एक पोलीस चौकी असून त्यात दोन अधिकारी नियुक्त आहेत, मात्र कोरोना काळापासून हे अधिकारी बंदूकधारी नसल्याची धक्कादायक बाब या निमित्ताने समोर आली आहे.
2010 साली ‘एटीएस’ने केली होती मंदिराची पाहणी
यापूर्वी 2010 मध्ये ‘एटीएस’ (दहशतवाद विरोधी पथक) कडून या मंदिराची सुरक्षा पाहणी करण्यात आली होती. त्यावेळीही मंदिराच्या सुरक्षेबाबत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता थेट केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मंदिराची अशी सखोल पाहणी करण्यात आली आहे.




























































