मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा; केवळ 49 टक्के पेरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा विभागात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्याचा फटका खरीप पिकांच्या पेरणीला बसला असून, आतापर्यंत केवळ ४९ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. पेरलेल्या पिकांची उगवणही समाधानकारक होऊ शकलेली नाही. उर्वरित पेरणी आणि पेरलेल्या पिकांसाठी पावसाची गरज आहे. बळीराजाही पावसाच्या मोठ्या प्रतीक्षेत आहे.

मराठवाडा विभागात खरीप पेरणीचे एकूण क्षेत्र ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर असून, आतापर्यंत केवळ २४ लाख ५५ हजार १३३ हेक्टरवर पेरणी झाली. या विभागातील मुख्य पीक कापूस असून, आतापर्यंत कापसाची केवळ २३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत अधिक असली तरीही पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना काळ्या आईची ओटी भरताना हात आखडता घ्यावा लागत आहे. मराठवाडा विभागात जून ते आतापर्यंत १५३.७मि.मी. पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत २२.३ टक्के पाऊस झाला आहे. अपेक्षित पर्जन्यमानात १३ टक्क्यांची तूट आहे. याचा फटका खरिपाच्या पेरणीला बसला आहे.

समाधानकारक पाऊस नसल्याने मराठवाडा विभागात खरिपाची अर्धवट पेरणी झाली आहे. तूर, मूग, उडीद आदी कडधान्याची केवळ ३२ टक्के पेरणी झाली असून, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन या सारख्या गळीत धान्यांची विभागात सरासरी ५४ टक्के पेरणी झाली आहे. विभागात सोयाबीन पेरणी योग्य क्षेत्र २२ लाख ९८ हजार १५५ हेक्टर असून, आतापर्यंत फक्त १२ लाख ४२ हजार ६३२ हेक्टरवर म्हणजे ५४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

खरिपाची सर्वाधिक ६३ टक्के पेरणी नदिड जिल्हयात असून, सर्वात कमी लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत फक्त ३३ टक्के पेरणी झाली आहे. या जिल्ह्यांत पाऊसच नसल्याने शेतकरी खरिपाची पेरणी करण्याचे धाडस करताना दिसत नाहीत. अन्य जिल्हयात छत्रपती संभाजीनगर- ५९ टक्के, जालना-५८ टक्के, बीड-४७ टक्के, परभणी-४६ टक्के आणि हिंगोली जिल्हघात ४७ टक्के खरीप पिकाची पेरणी झाली आहे.