पावसामुळे जनजीवन विस्कळीत, SIRचा कालावधी १० दिवस वाढवून द्यावा; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आदित्य ठाकरे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अशा परिस्थितीत एसआयआर प्रक्रियेसाठी असलेली मुदत आणखी १० दिवसांनी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आज त्यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “३० जूनपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी पावसाळी अधिवेशन आणि पावसाळ्यातील इतर कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेचा कालावधी संपल्यानंतरही आणखी १० दिवसांची मुदत वाढवून द्यावी.”

ते म्हणाले की, “राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही विनंती केली आहे की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर इमारतींचा पुनर्विकास सुरू असल्याने अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. अशा नागरिकांच्या सोयीसाठी, त्यांच्या पुनर्विकासाच्या मूळ जागेवरच नोंदणीसाठी बूथ लावण्यात यावा.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष किंवा सेक्रेटरींसोबत समन्वय साधून सोसायटीमध्येच एक दिवसासाठी बूथ लावण्यात यावा. यामुळे कर्मचारी आणि नागरिक या दोघांचाही वेळ वाचेल आणि नोंदणी सोपी होईल.”