
किल्लारीच्या महासंहारक भूकंपाच्या भीतिदायक जखमा मराठवाडा अजून विसरलेला नाही. मराठवाड्यातील भूकंपाचे धडकी भरवणारे वाढते धक्के म्हणजे उद्याच्या संकटाची चाहूल आहे. मात्र सध्याचे राज्यकर्ते फक्त फोडाफोडीच्या राजकारणात मग्न आहेत. आपत्तीमध्येही कॅमेऱ्यांच्या लखलखाटात दंग आहेत. मुंबईतील मुसळधार पावसाच्या वेळी आपत्कालीन वॉर रूममध्ये ‘चमकोगिरी’ करणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांना मराठवाड्यातील हादऱ्यांनी अजूनही ‘धक्के’ बसलेले नाहीत. ते सुस्तच आहेत. श्रीमान चमको, कळतंय का? मराठवाड्यात भूकंप झालाय!
महाराष्ट्रातील जनतेने किती धक्के सहन करावेत हेच कळेनासे झाले आहे. ज्याला आपण निसर्गाचा प्रकोप म्हणतो त्यामागेही मानवाचाच निर्घृण हात दिसू लागला आहे. पावसाचा कहर आणि वाताहत सुरू असताना मराठवाड्यातील तीन जिल्हे भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहेत. हिंगोली, परभणी, नांदेड जिह्यांत भूकंपाने भीतीचे सावट पसरले. गुरुवारी पहाटे नांदेडसह तीन जिल्हे भूकंपाने हादरले आणि त्यानंतर भ्रष्टाचाराच्या पायावर उभा राहिलेला नांदेडच्या विष्णूपुरी भागातील राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोसळून पडला. हा योगायोग म्हणावा लागेल. मराठवाड्याची जनता लातूर-किल्लारीच्या 30 सप्टेंबर 1993 सालच्या भूकंपाच्या भयंकर आठवणीतून आजही बाहेर पडलेली नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण भूकंपापैकी तो एक भूकंप होता. किल्लारीतील एक पिढी या धक्क्याने उद्ध्वस्त झाली. त्यामुळे जमीन हलू लागली की मराठवाड्यातील जनता अस्वस्थ होते. गेल्या काही काळापासून लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिह्यांत वारंवार भूकंपाचे धक्के बसले आहेत; पण सरकार अद्याप कुंभकर्णी अवस्थेत आहे. सरकारचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ निपचित पडले आहे. संपूर्ण विनाश झाल्याशिवाय फडणवीसांचे सरकार या धक्क्यांची दखल घेणार नाही. परभणी, हिंगोली, धाराशीवचे शिवसेना खासदार 50-50 कोटींत विकले गेले याचा अजिबात धक्का जनतेला बसला नाही. कारण ‘गद्दारी’ हा आता धक्का बसण्याचा विषय राहिलेला नाही; पण भूगर्भातून उसळणारा लाव्हा जमिनीला भेगा पाडतो, त्या धक्क्याने घरेदारे, संसार उद्ध्वस्त करतो. मनुष्यहानीचा बुलडोझर फिरवतो. कुटुंबेच्या कुटुंबे झोपेतच संपून जातात. या दुःखाला पारावार उरत नाही. मराठवाड्यात गुरुवारी 9 जुलैच्या पहाटे बसलेले भूकंपाचे चार धक्के आज सौम्य वाटत असले तरी उद्याच्या संकटांचा इशारा या धक्क्यांनी दिला आहे. आता विडंबन बघा, मुंबईत चार दिवस मुसळधार पाऊस पडला. आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री
कॅमेऱ्यांच्या प्रकाशझोतात
त्या आपत्कालीन वॉर रूममध्ये गेले. बरोबर मुख्यमंत्र्यांना नेले. चमकोगिरी केली, पण मराठवाड्याचा भूकंप व त्यानंतरचे आपत्ती व्यवस्थापन या चमकाेंच्या खिजगणतीत नाही. मराठवाड्याची उपेक्षाही अशीही होत असते. 9 जुलैच्या धक्क्यांनी केवळ मराठवाडाच नव्हे, तर लगतच्या विदर्भातील जिल्हेदेखील हादरले. यवतमाळ, वर्धा, बुलढाणा जिह्यातील मेहकर, लोणार, वाशीम व अमरावतीच्या काही भागांपर्यंत या भूकंपाचे हादरे जाणवले. पहिल्या धक्क्याचा केंद्रबिंदू भूगर्भाच्या आत 10 किलोमीटर खोल होता म्हणून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. केंद्रबिंदू आणखी वर असता तर काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. कारण मध्यरात्री पावणेदोनचा सुमार होता व नागरिक गाढ झोपेत होते. त्यात धक्क्याची तीव्रता अधिक असती वा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून कमी अंतरावर असता तर बचावाची संधी मिळणेही कठीण झाले असते. पहिल्या धक्क्याने नागरिक खडबडून जागे झाले आणि त्यापाठोपाठ सवादोन वाजता दुसरा, त्यानंतर दोन मिनिटांनी तिसरा व पहाटे 3.23 वाजता चौथा अशी भूकंपाच्या धक्क्यांची मालिकाच हिंगोली जिह्यात सुरू होती. लातूरच्या 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपानंतर लातूर, हिंगोली व नांदेड या तीन जिह्यांत सातत्याने भूकंपाचे हादरे बसत आहेत. 2020पासून गेल्या सहा वर्षांत हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत व कळमनुरी या चार तालुक्यांना तब्बल 37 धक्के बसले आहेत. यापैकी सर्वात मोठा धक्का 4.7 तीव्रतेचा 11 एप्रिल रोजी बसला. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी दोन तासांत बसलेल्या या चार धक्क्यांनी पुन्हा एकदा घबराट उडवली आहे. याआधी नांदेड शहरात 2006 ते 2008 दरम्यान भूकंपाचे धक्के व गूढ आवाजांची भीतिदायक मालिका सुरू होती. पाचशेहून अधिक छोटे-मोठे धक्के व कानठळ्या बसवणारे गूढ आवाज यामुळे नांदेड शहर दोन वर्षे
भीतीच्या सावटाखालीच
वावरत होते. त्यानंतर 21 जून 2019 रोजी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने नांदेड व परिसरातील 381 गावे हादरली होती. हिंगोली, नांदेड, परभणीशिवाय लातुरातही अजून भूकंपाचे धक्के अधूनमधून बसतच असतात. फक्त किल्लारीच्या ऐवजी आता होत असलेल्या भूकंपांचा केंद्रबिंदू लातूर व निलंगा तालुक्यात सरकला आहे. गेल्या काही वर्षांत लातूर जिह्यात 121 धक्के बसले आहेत. हिंगोलीतील ताज्या भूकंपाने केवळ मराठवाडाच नव्हे, तर लगतच्या कर्नाटक जिह्यातील बिदर जिल्हा व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, निजामाबादपर्यंत हादरे बसले. याचा अर्थ भूगर्भात केवळ खोलवरच नव्हे, तर मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटकपर्यंत दूरवर व्यापक हालचाली सुरू आहेत. हिंगोलीपासून तब्बल दोनशे ते तीनशे किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र हादरवणाऱ्या शक्तिशाली हालचाली भूगर्भात होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोयनेचा परिसर व ठाणे, शहापूर, पालघरच्या 300 किलोमीटरच्या परिसरातही अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असतात. कधी काळी भूकंपरोधक क्षेत्र असलेल्या महाराष्ट्राचा बराचसा भाग आता भूकंपप्रवण क्षेत्रात आला आहे. भविष्यात आणि भूगर्भाच्या पोटात काय दडले आहे, कुणालाच ठाऊक नाही. पण मराठवाड्यात सातत्याने सुरू असलेली भूकंपाची मालिका सरकार व प्रशासनाने खडबडून जागे व्हावे, अशी आहे. किल्लारीच्या महासंहारक भूकंपाच्या भीतिदायक जखमा मराठवाडा अजून विसरलेला नाही. मराठवाड्यातील भूकंपाचे धडकी भरवणारे वाढते धक्के म्हणजे उद्याच्या संकटाची चाहूल आहे. मात्र सध्याचे राज्यकर्ते फक्त फोडाफोडीच्या राजकारणात मग्न आहेत. आपत्तीमध्येही कॅमेऱ्यांच्या लखलखाटात दंग आहेत. मुंबईतील मुसळधार पावसाच्या वेळी आपत्कालीन वॉर रूममध्ये ‘चमकोगिरी’ करणाऱया मुख्यमंत्री आणि त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांना मराठवाड्यातील हादऱ्यांनी अजूनही ‘धक्के’ बसलेले नाहीत. ते सुस्तच आहेत. श्रीमान चमको, कळतंय का? मराठवाड्यात भूकंप झालाय!






























































