
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
इराण-अमेरिका संघर्षाने एक मूलभूत सत्य अधोरेखित केले आहे ते म्हणजे आधुनिक काळात कोणताही स्थिर लष्करी तळ पूर्णपणे सुरक्षित नाही. प्रचंड खर्च करून उभारलेले अमेरिकेचे आखाती तळही क्षेपणास्त्र आणि ड्रोन युगात असुरक्षित ठरले, परंतु याचा अर्थ परदेशी तळ निरुपयोगी आहेत असा होत नाही. त्यांचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. उलट अमेरिकेच्या अनुभवातून धडा घेत विखुरलेली, गतीशील, नेटवर्प-केंद्रित आणि बहुस्तरीय संरक्षण असलेली तळ व्यवस्था विकसित करावी. भविष्यातील युद्धे मोठय़ा तळांची नसून ‘वितरित शक्ती’, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन स्वॉर्म, क्षेपणास्त्र अचूकता आणि समुद्री नियंत्रण यांची असतील.
नुकत्याच झालेल्या इराण-अमेरिका संघर्षाने आधुनिक युद्धशास्त्रातील अनेक गृहितके मोडून काढली. अनेक दशकांपासून आखाती प्रदेशात उभारलेल्या अमेरिकेच्या प्रचंड लष्करी तळांना जगातील सर्वात सुरक्षित आणि अभेद्य संरक्षण व्यवस्था असल्याचे मानले जात होते. कतारमधील अल उदैद, बहारीनमधील पाचवा नौदल ताफा, पुवेत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि जॉर्डनमधील तळांवर अब्जावधी डॉलर खर्च करण्यात आले होते. मात्र इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी या तळांची असुरक्षितता उघड केली. अनेक तळांवरील रडार, हवाई संरक्षण प्रणाली, इंधन साठे, संचार केंद्रे आणि विमानांना हानी पोहोचल्याचे उपग्रह चित्रांमधून समोर आले.
अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील तळांचे प्रमुख उद्दिष्ट चार प्रकारचे होते.
ऊर्जा सुरक्षेचे संरक्षण – जगातील तेल पुरवठय़ाचा मोठा भाग पर्शियन आखात आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जातो. या मार्गांचे संरक्षण करणे हे अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट होते.
इराणला रोखणे – 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण अमेरिकेचा प्रमुख प्रादेशिक प्रतिस्पर्धी बनला. त्यामुळे इराणवर सतत दबाव ठेवण्यासाठी अमेरिकेने आखाताभोवती तळांचे जाळे उभारले.
दहशतवादविरोधी कारवाया – अफगाणिस्तान, इराक, सीरिया आणि इस्लामिक स्टेटविरुद्धच्या मोहिमांसाठी हे तळ वापरले गेले.
शक्ती प्रदर्शन – या तळांमुळे अमेरिका मध्यपूर्वेतील मित्रदेशांना सुरक्षा हमी देऊ शकली आणि संपूर्ण प्रदेशात प्रभाव राखू शकली.
हे तळ ‘‘सिटिंग डक्स’ का ठरले?
स्थिर लक्ष्यांची समस्या – कोणताही हवाई तळ, नौदल तळ किंवा लॉजिस्टिक केंद्र हे स्थिर लक्ष्य असते. त्याचे अचूक स्थान शत्रूला माहीत असते. पूर्वी हे फारसे धोकादायक नव्हते. कारण अचूक क्षेपणास्त्रे आणि मोठया प्रमाणातील ड्रोन सर्व देशांकडे उपलब्ध नव्हते, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. इराणकडे हजारो बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. काहींची मारक क्षमता 2000 किमीपेक्षा अधिक आहे. अगदी सर्वोत्तम संरक्षण प्रणालीसुद्धा एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे रोखू शकत नाहीत. शिवाय कमी किमतीचे शेकडो ड्रोन पाठवून संरक्षण प्रणाली गोंधळात टाकली जाऊ शकते. युव्रेन, रशिया, इस्रायल आणि इराणच्या युद्धांमधून हे सिद्ध झाले आहे. एक स्वस्त ड्रोन काही हजार डॉलरमध्ये तयार होतो. त्याला पाडण्यासाठी वापरले जाणारे पॅट्रियट थाड किंवा एसएम-3 इंटरसेप्टर लाखो डॉलरचे असतात. हा आर्थिक समतोल आक्रमणकर्त्याच्या बाजूने झुकतो. जगातील कोणतीही हवाई संरक्षण प्रणाली शंभर टक्के यशस्वी नसते. जर 200 क्षेपणास्त्रे डागली गेली आणि 90 टक्के रोखली गेली तरी 20 लक्ष्यांवर परिणाम होतो. लष्करी दृष्टिकोनातून ते पुरेसे असते. अमेरिकन हवाई संरक्षण व्यवस्था अपयशी का ठरली?
अमेरिकेची हवाई संरक्षण व्यवस्था अपयशी ठरली असे म्हणणे पूर्णपणे योग्य ठरणार नाही. तिने अनेक क्षेपणास्त्रे पाडली, परंतु खालील कारणांमुळे संपूर्ण संरक्षण शक्य झाले नाही.
इराणने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरले. वेगवेगळ्या दिशांनी आणि उंचीवरून हल्ले करण्यात आले. रडारपासून बचाव करून कमी उंचीवर उडणारी क्षेपणास्त्रे शोधणे कठीण असते. जीपीएस जॅमिंग, सायबर हल्ले आणि इलेक्ट्रॉनिक फसवणूक यामुळे संरक्षण व्यवस्थेवर ताण वाढतो.
मग या तळांचा उपयोग काय झाला?
काही तज्ञ या तळांना ‘व्हाईट एलिफंट’ म्हणत असले तरी ते पूर्णपणे निरुपयोगी नाहीत. इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या हजारो हवाई मोहिमा याच तळांवरून पार पडल्या.
लॉजिस्टिक हब – इंधन, दारूगोळा, सुटे भाग आणि सैन्याची वाहतूक यासाठी हे तळ अत्यंत महत्त्वाचे आहेत.
गुप्तचर आणि देखरेख. AWACS, उपग्रह नियंत्रण, ड्रोन ऑपरेशन आणि इलेक्ट्रॉनिक गुप्तचर कारवाया याच तळांवरून होतात.
मित्रदेशांना आश्वासन – या तळांमुळे आखाती देशांना अमेरिकेच्या सुरक्षेची हमी मिळते.
हवाई हल्ले – इराणच्या लष्करी आणि अणुस्थळांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकन विमाने या तळांवरून उड्डाण करत होती.
ISR ऑपरेशन्स. Intelligence, Surveillance and Reconnaissance मोहिमा चालवण्यात आल्या.
इराणी हल्ले रोखण्यासाठी THAAD आणि Patriot प्रणाली तैनात करण्यात आल्या.
बहारीनमधील पाचव्या ताफ्याद्वारे पर्शियन आखातातील समुद्री मार्गांवर नियंत्रण ठेवण्यात आले.
भारतासाठी महत्त्वाचे धडे
मोठ्या लष्करी तळांवर अवलंबित्व टाळा. एकच विशाल तळ निर्माण करण्याऐवजी अनेक लहान, विखुरलेल्या सुविधा उभाराव्यात.
डिस्पर्स्ड ऑपरेशन्स – विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि दारूगोळा वेगवेगळ्या ठिकाणी विखरून ठेवावा.
भूमिगत सुविधा – इंधन, दारूगोळा आणि कमांड सेंटर भूमिगत करावेत.
बहुस्तरीय हवाई संरक्षण – ए-400, MR-SAM, Akash, लेझर प्रणाली आणि अँटिड्रोन नेटवर्प एकत्रित करावे.
हार्डनिंग – विमानतळ, रडार आणि कमांड पोस्ट मजबूत संरक्षित आश्रयस्थानांमध्ये ठेवावेत.
गतिशीलता – मोबाईल क्षेपणास्त्र लाँचर आणि मोबाईल रडार यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करावा.
अंदमान – निकोबारचे सैनिकीकरण – अंदमान आणि निकोबार बेटे भारतीय महासागरातील सर्वात महत्त्वाचा धोरणात्मक लाभ आहेत.
समुद्री नाकेबंदी क्षमता – मलाक्का, लोम्बोक आणि सुंडा सामुद्रधुनींवर नजर ठेवण्याची क्षमता वाढवावी.
पाणबुडी युद्धशक्ती – अणुऊर्जेवर चालणाऱया हल्लेखोर पाणबुडय़ांची संख्या वाढवावी.
लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे – ब्राह्मोस ब्लॉक-III, हायपरसॉनिक प्रणाली आणि समुद्राधारित क्षेपणास्त्रांची संख्या वाढवावी. मि
त्रराष्ट्रांचे जाळे – क्वॉड, फ्रान्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मॉरिशस, सेशेल्स आणि ओमान यांच्यासोबत प्रवेश करार वाढवावेत.
माहिती युद्ध – उपग्रह, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांमध्ये मोठी गुंतवणूक करावी.






























































