वेब न्यूज – सायबर गुन्हेगारीचा LPG सिलिंडरला विळखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

शेअर बाजार, डिजिटल अटक आणि ऑनलाइन टास्कच्या नावाखाली होणाऱया फसवणुकीचे प्रकार ताजे असतानाच सायबर गुन्हेगारांनी आता थेट लोकांच्या स्वयंपाकघरात डोकावून नवा डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. सध्या बाजारात पसरलेल्या एलपीजी गॅस पुरवठ्याच्या टंचाईचा आणि चिंतेचा गैरफायदा घेत सायबर भामटय़ांनी सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्यासाठी बनावट बुकिंग संकेतस्थळे आणि घातक एपीके (APK) लिंक्सचा सुळसुळाट केला आहे.

सायबर सेलकडे नोंदवल्या गेलेल्या ताज्या तक्रारींनुसार, नागरिकांना तुमचे गॅसचे बिल प्रलंबित आहे, केवायसी (KYC) अपूर्ण आहे किंवा आधार लिंकिंग न केल्यास गॅस पुरवठा खंडित केला जाईल, असे तातडीचे आणि भीती घालणारे संदेश पाठवले जात आहेत. अनेक घटनांमध्ये ग्राहकांनी अशा फसव्या लिंकवर केवळ एक क्लिक केले आणि काही सेकंदांतच त्यांची बँक खाती रिकामी झाली, इतकेच नव्हे तर त्यांचे व्हॉट्सअॅप खातेही हॅक झाल्याचे समोर आले आहे. सायबरतज्ञांच्या मते, हे भामटे नामांकित ऑइल कंपन्यांच्या हुबेहूब दिसणाऱया बनावट वेबसाइट्स तयार करतात आणि गुगल सर्च रिझल्ट्स तसेच समाजमाध्यमांवरील जाहिरातींद्वारे लोकांना तिथे वळवतात. तिथे 24 ते 48 या तासांत गॅस सिलिंडर घरपोच देण्याचे खोटे आश्वासन देऊन यूपीआयद्वारे पैसे उकळले जातात. याशिवाय, व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर LPG booking नावाने पाठवल्या जाणाऱया APK फाइल्स डाऊनलोड करताच मोबाईलमध्ये गुप्तहेर सॉफ्टवेअर (Spyware) इन्स्टॉल होते, जे बँकेचे गोपनीय ओटीपी चोरून थेट सायबर चोरांना पाठवते.

डिजिटल इंडियाच्या युगात ही अत्यंत गंभीर बाब आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवरून गॅस बुकिंग करणे किंवा व्हॉट्सअॅपवरील संशयास्पद फाइल्स डाऊनलोड करणे पूर्णपणे टाळावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्यतो आपल्या गॅस वितरण कंपनीचे ऑप्लिकेशन ऑनलाइन बुकिंगसाठी वापरावे अथवा गॅस वितरण कंपनीच्या अधिकृत फोन नंबरवर मिस्ड काॅल देऊन गॅस बुक करावा. ग्राहकांच्या गरजेचा आणि भीतीचा व्यापार करणाऱया या डिजिटल चोरांपासून वेळीच सावध राहणे हाच सध्या एकमेव सुरक्षित उपाय आहे.