विद्यार्थ्यांसाठी उभारली अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लास रूम; मराठी शाळा वाचवण्यासाठी गोरेगावच्या ‘नूतन विद्यामंदिर’चा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी शाळा वाचवण्यासाठी गोरेगावच्या नूतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र विद्यालयाकडून अभिनव उपक्रम हाती घेतला गेला आहे. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मोफत मिळावे, यासाठी विद्यालयात अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लास रूम आणि सायन्स लॅबसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे शाळेतील पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे.

पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र विद्यालयाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. शिवसेनेच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या निधीतून तसेच रोटरी क्लबच्या सहाय्याने या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या सल्ल्याने शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

सर्व वर्ग डिजिटल करणार 

मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी संस्थेने इंग्रजी शाळांमधील महागड्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. सुरुवातीला तीन वर्ग स्मार्ट रूम केले असून, भविष्यात सर्व वर्ग डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अनिल देसाई यांनी दिली. या उपक्रमाला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याचेही देसाई यांनी सांगितले.