
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील कोडा गावात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बागेश्वर धामचे महंत पंडित धिरेंद्र शास्त्री याचा भाऊ शालिग्राम गर्ग याच्यासह अंकित मिश्राला अटक केली आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे शालिग्राम गर्ग आणि अंकित मिश्रा यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत एकूण चार आरोपींचा समावेश आहे, ज्यात तीन नामनिर्देशित आणि एका अज्ञात आरोपीचा समावेश आहे. अटक केलेल्या दोन आरोपींची चौकशी सुरू असून, इतर आरोपींच्या शोधात पोलीस पथके सातत्याने छापे टाकत आहेत, असे पोलीस अधिकारी अतिरिक्त एसपी आदित्य पाटले यांनी सांगितले.
जमिनीच्या वादातून आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तीन राऊंड फायरिंग केल्याचा पीडिताने आरोप केला आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला. जखमीवर सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ग्वाल्हेरला हलवण्यात आले.
तपासादरम्यान, पोलिसांनी घटनेत वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. पुढील तपास सुरू असून, तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.





























































