जमिनीच्या वादातून मुलाकडून बापाची गोळ्या झाडून हत्या, आरोपी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनीच्या वादातून पोटच्या मुलानेच बापाची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. हरिओम चौधरी असे मयत बापाचे तर निखिल चौधरी असे आरोपी मुलाचे नाव आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबादमधील मोदीनगर भागात बुधवारी रात्री ही घटना घडली. मयत हरिओम चौधरी यांची गणना परिसरातील श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये केली जात असे. चौधरी यांच्या मालकीची मोदीनगरमध्ये 75 बिघे जमीन होती आणि दिल्ली-मेरठ रोडवर एक बाजारपेठही होती. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 150 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

चौधरी यांचा मोठा मुलगा निखिल याला मद्यपानाचे व्यसन होते. यावरून वडील त्याला अनेकदा ओरडत असत. चौधरी यांनी त्याला बाजारपेठेतील दुकाने आणि 25 बिघे जमीन यापूर्वीच दिली होती. मात्र, निखिलला उरलेली जमीनही आपल्या नावावर करून घ्यायची होती. वडिलांनी त्याला नकार दिला.

हरिओम चौधरी यांनी बुधवारी रात्री पत्नी आणि धाकट्या मुलासोबत जेवण केले होते. यानंतर मोठा मुलगा उशिरा मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. मद्यपान केल्याबद्दल वडिलांनी त्याला ओरडल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादादरम्यान निखिलने पिस्तूल काढले आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या. एक गोळी हरिओम यांच्या चेहऱ्यावर लागली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर आणखी गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मोदीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी 2018 मध्येही एका वादानंतर निखिलने आपल्या धाकटा भावावर गोळी झाडली होती. पोलीस आता त्या प्रकरणाचाही तपास करत आहेत.