
राज्यातील ९२ लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्यानंतर महायुती सरकारने गरिबांची वस्त्रेही हिरावून घेतली आहेत. रेशनकार्डवर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येत होती. तीसुद्धा सरकारने आर्थिक भाराचे कारण देत बंद केली आहे.
लाडकी बहीण योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. अशा शिधापत्रिकाधारकांना दरवर्षी यंत्रमागावर विणलेली एक साडी मोफत देण्याची योजना २०२३ पासून सुरू करण्यात आली होती. वस्त्रोद्योग विभागाने तसा शासन निर्णय त्यावेळी जारी केला होता. पाच वर्षांसाठी म्हणजे २०२८ पर्यंत ही योजना राबवण्यात येईल, असे त्यात जाहीर करण्यात आले होते. मात्र आज वस्त्रोद्योग विभागानेच शासन निर्णय जारी करून ही योजना बंद केली. त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आली आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या २०२३ मध्ये २४ लाख ५८ हजार ७४७ असून या सर्व कार्डधारकांना वर्षभरातील एका ठराविक सणाच्या दिवशी वस्त्रोद्योग विभागाच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेंतर्गत एक साडी मोफत देण्यात येत होती.





























































