
जंतरमंतरवरील आंदोलकांवर केलेला अमानुष लाठीचार्ज आणि नीट पेपरफुटीप्रकरणी सरकारविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आंबेडकर अनुयायांसह सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून हुकूमशाही सरकारचा निषेध केला. राज्यातील अनेक भागांत बाजारपेठा बंद होत्या. तर काही ठिकाणी रास्तारोकोमुळे वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला.
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. यानुसार मुंबईसह ठाण्यातही अनेक ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. ठाण्यात आक्रमक झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसई, विरारमध्येही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. विक्रोळीत वंचितचे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भांडूपमध्येही वंचितच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्येही दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
राज्यभर आंदोलन
धाराशिवमध्ये कळंब तालुक्यातील मसा खंडेश्वरी येथे आंदोलकांनी येरमाळा-कळंब रोडवर चक्काजाम केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दुकाने बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला. अमरावतीमध्ये बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला असून तिवसा आणि दर्यापूर शहरात दिवसभर बंद पाळण्यात आला. नांदेड-वर्ध्यामध्येही अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला असून यवतमाळमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला. अकोल्यात आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी चंद्रपूर-हैदराबाद मार्गावर आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली.

































































