सरकारी रुग्णालयांची गुणवत्ता तपासणार, खराब रुग्ण सेवा देणाऱ्यांना शून्य स्टार मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या शासकीय रुग्णालयांतील वाढती गर्दी, डॉक्टरांची आणि कर्मचाऱयांची अपुरी संख्या आणि अपुरी साधने अशा विविध कारणांमुळे शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा खालावत चालली असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. पण आता सरकारी रुग्णालयांच्या सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने स्टार रेटिंग प्रणाली लागू केली आहे. ग्रामीण रुग्णालयांपासून जिल्हा रुग्णालयांच्या वैद्यकीय सेवांचे मूल्यमापन होणार आहे. निकषाची पूर्तता न करणाऱया रुग्णालयांना शून्य स्टार मिळणार आहे.

शासकीय रुग्णालयांच्या कामकाजाची तपासणी आणि डेटाबेसच्या आधारे दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यात दोन वेळा मूल्यांकन होईल. चार किंवा त्यापेक्षा अधिक स्टार मिळविणाऱया रुग्णालयांना विशेष गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. रुग्णालयात येणाऱया प्रत्येक रुग्णाला त्याच्या आजाराच्या निकडीनुसार अपेक्षित असलेल्या आवश्यक सेवा रुग्णालयात त्वरित उपलब्ध असाव्यात तसेच सेवा देण्यासाठी डॉक्टर व इतर सहाय्यक कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक आहे.

दहा निकषांवर मिळणार रेटिंग

या प्रणालीअंतर्गत रुग्णालयांचे मूल्यांकन सेवेची उपलब्धता, डॉक्टर व कर्मचाऱयांची उपस्थिती, आवश्यक औषधांचा साठा, निदान चाचण्या, ओपीडी व बेड ऑक्युपन्सी, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता आणि रुग्णांचा अभिप्राय अशा दहा निकषांवर केले जाणार आहे. प्रत्येक निकषासाठी अर्धा स्टार देण्यात येईल आणि सर्व निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयाला पाच स्टार मानांकन मिळेल. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत प्रथमच अशा प्रकारे रेटिंग दिले जाणार आहे.

वैद्यकीय चाचण्या व औषधांची मोजणी

रुग्णाच्या चाचण्या व निदान झाल्यावर त्याला आवश्यक औषधे त्याच रुग्णालयात मिळाल्यावर रुग्णाला बरे वाटणे तसेच वैद्यकीय प्रयोगशाळा आणि अत्यावश्यक औषधांची उपलब्धता, एक्स रे व ईजीसी चाचण्यांचा वापर मोजला जाईल. स्वच्छतेपासून वागणुकीचे मूल्यमापन रुग्णालयातील स्वच्छता, उपचारांच्या दरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिला जाणारा आदर, मानसिक आधार आणि त्यातून रुग्णांकडून वैद्यकीय सेवेच्या अनुभवावर थेट माहिती घेतली जाईल. संस्थेची सुविधांची स्थिती तपासली जाईल.