
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनापुढे बॅकफुटवर आलेल्या मोदी सरकारने आंदोलकाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारसोबत आज दुपारी सीजेपीच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. सरकारकडून सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर जंतरमंतरवर 20 जूनपासून सुरू असलेले आंदोलन तत्काळ मागे घेण्यात आले. आंदोलकांनी शांततेने माघारी परतावे, असे आवाहन सीजेपीच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत केले.
सीजेपीचे प्रवत्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची दिल्लीत कॉन्स्टिटय़ुशनल क्लब येथे आज दुपारी तिसरी बैठक झाली. त्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. सीजेपीचे प्रवत्ते सौरभ दास यांनी सांगितले की, आमच्या तीन मागण्या होत्या. पहिली मागणी पूर्ण झाली आहे. दुसरी मागणी सरकारने मान्य केली आहे. 15 ते 20 एफआयआर दिल्लीत दाखल झाले आहेत. ते लवकरच मागे घेण्यात येतील. एफआयआरच्या प्रती सरकार आम्हाला देणार आहे. याशिवाय या आंदोलनासंदर्भात आंदोलक आणि सीजेपीच्या आयोजकांवर यापुढे एफआयआर दाखल होणार नाहीत. आम्ही सरकारला यासंदर्भात लेखी हमी म्हणून एक मसुदा दिला आहे. तो मंगळवारपर्यंत देण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाले आहे, असे सौरभ दास यांनी सांगितले. तर, सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे चांगल्या भावनेने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करतो, असे आशुतोष रांका म्हणाले.
शिक्षण सुधारणेच्या पंचसूत्रीवर चर्चा होणार
आशुतोष रांका यांनी सांगितले की, आम्ही सरकारसोबत शैक्षणिक सुधारणांबाबत पाच मुद्द्यांचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी चार आठवडय़ांनी सरकारसोबत सीजेपीच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक होणार आहे. सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे चांगल्या भावनेने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करतो, असे आशुतोष रांका म्हणाले.
- दिल्लीसह भाजपशासित राज्यांमध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. त्यानंतर कोणतीही कारवाई होणार नाही हे सरकारने मान्य केले आहे. परीक्षा सुधारणेसाठी सरकार चिंतन करेल आणि त्याबाबत सीजेपीला माहिती देण्यात येईल. आत्महत्या करणाऱया विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रति आमची सहानुभूती आहे. या कुटुंबीयांना नियमांनुसार सन्मानजनक व जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात येईल, असे नड्डा म्हणाले.
कॉक्रोच पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला
सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, सीजेपीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माध्यमांवर हल्ला झाला, मात्र आमचे आंदोलनकर्ते विद्यार्थी समजूतदार आहेत. आंदोलनात काही उपद्रवी लोक आले होते. त्यांनी वातावरण बिघडवले. माध्यमांवर ज्यांनी हल्ले केले, ते आमचे समर्थक नाहीत. आमचा लढा विद्यार्थ्यांसाठी होता. आम्ही श्रेय घेण्यासाठी लढत नव्हतो. तरुणांना जागे करण्यात सीजेपीची भूमिका राहिली. ज्या राजकीय पक्षांनी त्यांच्या पातळीवर आंदोलन केले, त्यांचे आम्ही आभार मानतो, असे दोघे म्हणाले.




























































